अंतिम फेरीत आज भारतापुढे इंग्लंडचे आव्हान

वर्ष २००५.. भारतीय संघ महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत जेतेपद पटकावले. वर्ष २०१७.. भारतीय संघ पुन्हा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण यावेळी सहा वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान त्यांनी उपांत्य फेरीतच परतून लावले आहे. त्यामुळे यावेळी अंतिम फेरीत प्रवेश करताना भारताचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. आतापर्यंत भारताला एकदाही विश्वचषक पटकावता आलेला नाही. त्यामुळे यावेळी इतिहास रचण्यासाठी भारतीय संघ एक पाऊल दूर आहे. आतो यजमान इंग्लंडला पराभूत करून जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

या विश्वचषकाचा अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात येणार आहे. याच मैदानात भारताने १९८३ साली विंडीजचे वर्चस्व झुगारत इतिहास रचला होता. त्याच मैदानात महिलांचा भारतीय संघ इतिहास घडवणार का, याकडे साऱ्यांचे डोळे लागले आहेत. विश्वचषक साखळी फेरीत भारताने इंग्लंडला पराभूत केले होते. या कामगिरीची पुनरावृत्ती भारतीय संघाकडून पाहायला मिळणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

भारतीय महिला संघ जेव्हा २००५ साली विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, त्यावेळी कर्णधार मिताली राज आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी त्या संघात होत्या. हा त्यांचा अखेरचा विश्वचषक असेल. भारतीय महिला क्रिकेटमधील त्यांचे योगदान पाहता त्यांना या विश्वचषकाची भेट देण्याचा संघसहकाऱ्यांचा मानस असेल.

भारतीय संघात एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. पण मिताली, पूनम राऊत, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमृर्ती यांनी जेव्हा संघाला गरज भासली तेव्हा दमदार कामगिरी उंचावत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली आहे. गेल्या सामन्यात तर हरमनप्रीतने एकहाती धडाकेबाज फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियासारख्या संघाला नतमस्तक होण्यास भाग पाडले होते. या विश्वचषकात मितालीने आतापर्यंत ३९२ धावा केल्या असून पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या इलिस पेरीला (४०४ धावा) मागे टाकण्यासाठी ती प्रयत्नशील असेल.  गोलंदाजीमध्ये झुलन आणि शिखा पांडे यांनी सातत्याने भेदक मारा केला आहे. त्यांना पूनम राऊत, दीप्ती शर्मा यांनी चांगली साथ दिली आहे. आतापर्यंतच्या विश्वचषकात मितालीकडून चांगले नेतृत्वही पाहायला मिळाले आहे.

यष्टिरक्षक-फलंदाज सारा टेलरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. अनेया श्रुबसोल ही एकहाती विजय मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. फलंदाजी व गोलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणात ते तरबेज आहेत. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडचा संघ लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\

बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षांव

महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश करणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने खास बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यात येणार आहे. बीसीसीआयने हे शनिवारी जाहीर केल्यामुळे रविवारी अंतिम फेरी खेळण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल.

आतापर्यंतच्या स्पर्धेत आमची कामगिरी चांगली झालेली नाही. पण अंतिम फेरीच्या सामन्यात आमच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होऊ शकते. आता आमच्या हातात फक्त एकच सामना राहिला आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी केली तर नक्कीच आम्ही जेतेपदाला गवसणी घालू शकतो.

हिथर नाइट, इंग्लंडची कर्णधार

इंग्लंडसाठी हा अंतिम फेरीचा सामना नक्कीच सोपा नसेल. कारण ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाला आम्ही उपांत्य फेरीत पराभूत केले आहे. त्यामुळे खेळाडूंचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. पण रविवारी आमच्याकडून कशी कामगिरी होते, यावर सारे काही अवलंबून असेल.

मिताली राज, भारताची कर्णधार

संघ

  • इंग्लंड : हिथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, कॅथेरीन बंट्र, जॉर्जिया इलव्हिस, जेनी गुन, अ‍ॅलेक्स हार्टली, डॅनियल हॅझेल, बेथ लँगस्टॉन, फॅ्रन विल्सन, लाऊरा मार्श, अनेया श्रुबसोल, नॅटली सिव्हर, सारा टेलर, डॅनियल व्ॉट, लाऊरेन विनफिल्ड.
  • भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनस राऊत, दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, नुझहत परविन, स्मृती मंधाना.

वेळ : दुपारी. ३.०० वा. पासून. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस वाहिनी.