महिला फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन २०१९ साली फ्रान्समध्ये

मॉस्को : रशियातील पुरुषांच्या विश्वचषक समाप्तीप्रसंगी संपूर्ण विश्व एकमेकांना ‘आता भेटू पुढच्या विश्वचषकात, २०२२ साली कतारला ’ अशा संदेशासह शुभेच्छा देत होते. मात्र, पुढील विश्वचषक हा कतारमध्ये नसून फ्रान्समध्ये २०१९ सालीच होणार आहे. फक्त तो महिलांचा फुटबॉल विश्वचषक असेल.

महिलांच्या फुटबॉल विश्वचषकालादेखील तितकेच महत्त्व देण्याचा निर्णय २०१६ सालीच झाला होता. त्यानुसार फिफा अध्यक्ष गिआनी इन्फॅन्टिनो यांनी फातमा सॅमोऊरा यांची फिफाच्या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळावर महिला सरचिटणीस म्हणून निवडदेखील केली होती. त्यावेळेपासूनच महिला विश्वचषकदेखील तितक्याच सुयोग्य नियोजनासह भरवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या फातमा फिफा पुरुष विश्वचषकातील सामन्यांप्रसंगी काही वेळा दिसल्या. मात्र, विश्वचषकाच्या पुरस्कार वितरणप्रसंगी त्यांना कुठेच स्थान देण्यात आले नव्हते.

मॉस्कोत झालेल्या पत्रकार परिषदेत फिफा अध्यक्ष इन्फॅन्टिनो म्हणाले ‘‘महिला फुटबॉल विश्वचषकात अजून मोठी गुंतवणूक करायची आहे. त्याशिवाय महिलांच्या फुटबॉलसाठी एका स्वतंत्र लीगचादेखील आम्ही विचार करीत आहोत. महिलांचे विश्वातील प्रमाण हे ५० टक्के असून त्यांना फुटबॉलमध्येही तितकेच मोठे स्थान मिळायला हवे असे आमचे मत आहे.  तसेच महिला विश्वचषकासाठी अजून काही करण्याचा इरादा आहे,’’ असे सांगून पत्रकार परिषद आटोपती घेतली होती. त्यामुळे महिला विश्वचषकासाठी नक्की काय योजना आहेत, त्याचा उलगडा होऊ शकला नव्हता.  पुरुषांचा विश्वचषक हा नेहमी खऱ्या हिरवळीवर होत असताना गतवेळचा महिलांचा २०१५चा विश्वचषक हा टर्फवर भरवला गेला होता. त्याबाबत अमेरिकेची फुटबॉलपटू अ‍ॅबी वॉम्बॅक यांनी त्याचा जाहीर निषेध केला होता.अंतिम सामन्यात जपानला हरवून अमेरिकेन महिलांनी विजेतेपद पटकावल्यानंतर पुरस्काराच्या रकमेबाबतही या महिला खेळाडूंनी अमेरिकन सॉकर संघटनेशी बोलणी करून त्यात वाढ करून घेतली होती.  आता महिलांचा पुढील विश्वचषक फ्रान्सला होणार असल्याने महिलांनाही चांगल्या सुविधा मिळतील अशी आशा त्यांना आहे.

व्हीएआर वापराबाबत संभ्रम

यंदाच्या पुरुष विश्वचषकात ज्याप्रमाणे व्हीएआर तंत्रज्ञानाचा वापर झाला होता, तसा वापर महिला फुटबॉल विश्वचषकातही केला जाणार किंवा नाही, याबाबत फिफाने अद्याप कोणताच खुलासा केलेला नाही. त्यामुळे व्हीएआर तंत्रज्ञान वापरणार की नाही, त्याबाबत अद्याप संभ्रमावस्था कायम आहे.

विजेत्यांच्या रकमेबाबतही अनिश्चिती

अमेरिकेच्या महिलांनी २०१५ साली मागील विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांना २० लक्ष डॉलर इतक्या पुरस्काराची रक्कम प्रदान करण्यात आली होती. तर फ्रान्सने नुकत्याच जिंकलेल्या विश्वचषकात त्यांना ३८०लाख डॉलर इतकी मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. त्यामुळे आता महिला विश्वचषकात पुरस्कार रक्कम किती देणार? याबाबत उत्सुकता असली तरी फिफाच्या वतीने त्याबाबत अद्याप अधिकृतरीत्या खुलासा करण्यात आलेला नाही.