छत्रपती शिवाजी कबड्डी स्पर्धा

इस्लामपूर, सांगली येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिलांच्या गटात ठाणे, कोल्हापूर आणि नाशिक या संघांनी बाद फेरीत प्रवेश केला. पुरुषांमध्ये नंदुरबारने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.

महिलांमध्ये ठाणे संघाने साताऱ्यावर ४६-३८ अशी मात करत विजयी घोडदौड कायम ठेवली. मध्यंतरापर्यंत साताराकडे २१-२० अशी नाममात्र आघाडी असताना ठाण्याच्या माधुरी गवंडी हिने आक्रमक पवित्रा घेत जोरदार मुसंडी मारली. साताऱ्याची सोनाली हेळवी चमक दाखवू शकली नाही. कोल्हापूरने सिंधुदुर्गचा ४६-२१ असा धुव्वा उडवत आरामात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. नाशिकने रायगडवर २५-१७ असा विजय मिळवत बाद फेरी गाठली.

पुरुष विभागात नंदुरबार आणि बीड यांच्यात झालेल्या सामन्यात नंदुरबारने ३७-११ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. महिला विभागात पुणे विरुद्ध कोल्हापूर, पालघर विरुद्ध ठाणे, मुंबई उपनगर विरुद्ध रत्नागिरी, मुंबई शहर विरुद्ध नाशिक असे उपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील. पुरुष विभागात मुंबई शहर विरुद्ध नंदुरबार यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होतील.

मंगळवारी संध्याकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात यजमान सांगलीसह रायगड, मुंबई शहरने पुरुष विभागात तर पुणे, मुंबई उपनगर, पालघर संघांनी महिला विभागात बाद फेरीत प्रवेश केला.

पुरुष विभागात रायगडने आपल्या तिसऱ्या साखळी सामन्यात अमरावतीचा ४०-१३ असा पराभव करत तीन विजयांसह गटात अव्वल स्थान मिळवले. सांगलीने कोल्हापूरचा १४-११ असा पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. महिलांमध्ये, पुणे संघाने ठाणे संघाचे आव्हान ३४-२५ असे परतवून लावले.