महिला विश्वचषक कबड्डी स्पध्रेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना राज्य सरकारने होळीची अनोखी भेट   दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी प्रत्येकी एक कोटी रूपयांचा तर प्रशिक्षकांना २५ लाख रूपयांच्या बक्षिसाचा धनादेश देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने तसेच आशियाई राष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या सहकार्याने दि. १ते ४ मार्च २०१२ या कालावधीत पाटणा (बिहार) येथे झालेल्या पहिल्या विश्वचषक महिला कबड्डी स्पध्रेत भारतीय महिला कबड्डी संघाने विजेतेपद पटकावून दैदिप्यमान कामगिरी केली होती. या संघामध्ये सहभागी महाराष्ट्रातील दीपीका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या तीन खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी तर प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांना २५ लाख रूपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. त्यानुसार आज विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेळाडूंना धनादेश देण्यात आले. तर, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशिक्षक भेंडीगिरी यांच्यावतीने कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेचे सरचिटणीस उदय चव्हाण यांनी धनादेश स्वीकारला.
याप्रसंगी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष मदन पाटील, आमदार भाई जगताप, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव जे.एस.सहारिया, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा सहसंचालक एन.एम.सोपल, मुंबई विभाग क्रीडा व युवक सेवा उपसंचालक एन.बी.मोटे यांच्यासह खेळाडूंचे पालक, प्रशिक्षक आदी उपस्थित होते.
राज्यातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.चव्हाण, उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी प्रास्ताविकाद्वारे खेळाडूंचा परिचय करून देत त्यांच्या कामगिरीचा गौरव केला आणि या यशाबद्दल राज्य मंत्रिमंडळाने खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना गौरविण्याचा निर्णय घेतला होता, त्या अनुषंगाने आज धनादेश प्रदान करण्यात येत असल्याचे सांगितले.
गेल्या वर्षी बक्षीसासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषणा केली होती. परंतु गेल्या वर्षभर हे बक्षीस लालफितीतच अडकून पडले होते.
‘लोकसत्ता’ने वर्षभर या घोषणेचा पाठपुरावा केला आणि अखेर शासनास आश्वासनपूर्ती करावी लागली.