महिलांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

नागपूर :  साखळी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करीत बाद फेरी गाठणाऱ्या विदर्भाच्या महिलांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढत धुळवडीनंतर म्हणजे ३० मार्चला आंधप्रदेशविरुद्ध राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणार आहे. उभय संघ उपांत्यफेरी गाठण्यासाठी खेळणार असल्यामुळे सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

चेन्नई येथे एलिट ‘इ’ गटातील साखळी सामने खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने पहिल्या तिन्ही सामन्यात मेघालय, तामिळनाडू व हिमाचल प्रदेशला नमवण्याची कामगिरी केली. परंतु, दिल्लीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे विदर्भाचा बादफेरीचा मार्ग कठीण झाला होता. मात्र, शेवटच्या साखळी सामन्यात विदर्भाने बलाढ्य कर्नाटकला नमवून गुणसंख्या १६ करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. साखळी सामन्यात फलंदाजीमध्ये भारती फुलमाळी, दिशा कासट, वैष्णवी खंडकर कृतिका पोफळी व अंकिता भोंगाडे यांनी चांगली कामगिरी केली असून महत्त्वपूर्ण उपांत्यपूर्व सामन्यात धावांचा डोंगर उभारण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. साखळी सामने गाजवणाऱ्या नुपूर कोहळे, वैष्णवी खंडकर, गार्गी वनकर व दिशा कासट या गोलदाजांनी आंध्र प्रदेशला कमी धावांत रोखण्याची योजना आखली आहे.

जयपूर येथे एलिट ‘सी’ गटातील साखळी सामन्यात आंध्रप्रदेशने उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीच्या बळावर उत्तरप्रदेश, चंदीगड, राजस्थान, महाराष्ट्र व गोवा संघाला पराभवाचा धक्का दिला. या कामगिरीच्या बळावर गुणसंख्या २० करीत आंध्रप्रदेशने दिमाखात बादफेरी गाठली आहे. साखळी सामन्यात फलंदाजीमध्ये सी. एच. झांसी लक्ष्मी, व्ही. पुष्पा लाथा, एन. अनुशा, एस. हिमा बिंदूने आणि गोलंदाजीमध्ये जी. चंद्रलेखा, झांसी लक्ष्मी, सरन्या गडवाल, ई. पद्मजा व के. ज्योतीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.