स्वीटीचे आव्हान संपुष्टात; पिंकी, सिमरनजीत उपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारताच्या सोनिया चहलने ५७ किलो गटाच्या वादग्रस्त लढतीत माजी विश्वविजेत्या स्टॅनिमिरा पेत्रोव्हाला नमवून जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. याचप्रमाणे अनुभवी पिंकी जांग्रा आणि सिमरनजीत कौर यांनीसुद्धा उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. मात्र ७५ किलो गटात स्वीटी बुराचे आव्हान संपुष्टात आले आहे.

खाशाबा जाधव हॉलमध्ये सुरू असलेल्या या जागतिक स्पर्धेत भारताच्या आठ बॉक्सिंगपटूंनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. ८१ किलोहून अधिक गटात सीमाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यामुळे थेट उपांत्यपूर्व फेरी गाठता आली आहे.

हरयाणामधील शेतकरीकन्या सोनिया दुसऱ्या फेरीनंतर पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर अंतिम फेरीत तिने जोरदार मुसंडी मारत लढत ३-२ अशा फरकाने जिंकली. पाचही सामनाधिकाऱ्यांनी तिसऱ्या फेरीत भारताच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे २०१४ मध्ये ५४ किलो गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या पेत्रोव्हाने नाराजी प्रकट केली.

२०१६ मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकणाऱ्या सोनियाने मागील वर्षी सर्बिया चषक स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय चालू वर्षांत अहमेट कॉमर्ट बॉक्सिंग स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवले होते. सोनियाची उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या अरियास कॅस्टेनाडा येनी मार्सेलाशी गाठ पडणार आहे.

७५ किलो गटाच्या पहिल्याच फेरीत २३ वर्षीय स्वीटीचा पराभव झाल्यामुळे भारताच्या वाटचालीला धक्का बसला आहे. पोलंडच्या एल्झबिटा वॉजसिकने तिचा आरामात पराभव केला. स्वीटीने २०१४ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या ८१ किलो गटात रौप्यपदक मिळवले होते.

५१ किलो गटात पिंकी जांग्राने इंग्लंडच्या ईबोनी एलिस जोन्सचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिची उत्तर कोरियाच्या मि चोय पँगशी गाठ पडणार आहे. याचप्रमाणे ६४ किलो गटात लुधियानाच्या सिमरनजीत कौरने स्कॉटलंडच्या मेगान रीडला नामोहरम केले.

पेत्रोव्हाची टीका; प्रशिक्षक लेसोव्ह निलंबित

जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा सोमवारचा दिवस अतिशय वादग्रस्त ठरला. भारताच्या सोनिया चहलविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर माजी विश्वविजेत्या स्टॅनिमिरा पेत्रोव्हाने सामनाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे, तर बल्गेरियाचे प्रशिक्षक पीटर लेसोव्ह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बल्गेरियाच्या २७ वर्षीय स्टॅनिमिराने २०१४ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. मात्र २१ वर्षीय सोनियाविरुद्धच्या लढतीत ती २-३ अशा फरकाने पराभूत झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रशिक्षक लेसोव्ह यांनी बॉक्सिंग रिंगमध्ये पाण्याची बाटली फेकून गैरवर्तन केले आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने याची दखल घेत स्टॅनिमिराच्या लढतीचा पुनर्आढावा घेतला जाईल, असे म्हटले आहे. याचप्रमाणे लेसोव्ह यांना स्पर्धा संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.