इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय महिला क्रिकेटला ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे मत क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिने व्यक्त केले. ती गुरूवारी पुणे पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होती. यावेळी तिने इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धा आणि मायदेशी परतल्यानंतरचे अनुभव उपस्थितांसमोर कथन केले. विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी पहिल्यांदाच अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. अखेरच्या १० षटकांमध्ये केलेल्या चुकांमुळे आम्ही अंतिम सामना हरलो. मात्र, पुढचा विश्वचषक भारत नक्कीच जिंकेल, असा ठाम विश्वास यावेळी स्मृतीने व्यक्त केला.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक खेळाडूचे योगदान हे भारतीय संघाच्या खेळाचे वैशिष्ट्य राहिले. प्रत्येक सामन्यातील मॅच विनर वेगळा होता. एकूणच प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडल्यामुळे आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकलो. आजवर महिला क्रिकेटपटू आदर्श म्हणून पुरूष खेळाडुंकडेच बघत होत्या. मात्र, यंदाच्या विश्वचषकानंतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. यापुढे महिला क्रिकेटर्स भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिच्याकडे आदर्श म्हणून बघू शकतात. या विश्वचषकाने भारतीय महिला क्रिकेटर्सना स्वत:चा ओळख मिळवून दिली. त्यामुळे महिला क्रिकेटला ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे स्मृती मंधानाने सांगितले. परंतु, भविष्यात क्रिकेटमधील महिला आणि पुरूष हा भेदभाव बंद झाला पाहिजे, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली. यंदाच्या विश्वचषकानंतर अनेक महिला क्रिकेट क्षेत्राकडे वळायल्या लागल्या आहेत. त्यामुळे आयपीएलच्या धर्तीवर महिला क्रिकेट लीग सुरू करून या खेळाडुंना प्रोत्साहन दिले पाहिजे. बीसीसीआय यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे लवकर महिला क्रिकेट लीग सुरू होईल, अशी आशाही तिने व्यक्त केली.