वेस्ट इंडिजवर तीन गडी राखून मात; पूनमचे तीन बळी

फिरकीपटू पूनम यादवने तीन बळी घेतल्याने भारताच्या महिला संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सराव लढतीत वेस्ट इंडिजवर दोन धावांनी दणदणीत विजय मिळवता आला. याबरोबरच २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भारताने दाखवून दिले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताला २० षटकांत ८ बाद १०७ धावाच करता आल्या. शफाली वर्मा (१२), स्मृती मानधना (४) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (०) हे अव्वल फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे भारताची अवस्था ३.१ षटकांत ३ बाद १७ अशी झाली होती. कर्णधार हरमनप्रीत कौर हिलाही (११) मैदानावर टिकाव धरण्यात अपयश आले. मधल्या फळीतील दीप्ती शर्माने ३२ चेंडूत २१ धावा आणि शिखा पांडेने १६ चेंडूंत २४ धावा केल्यामुळे भारत शंभरी धावसंख्या गाठू शकला.

विजयासाठीचे माफक आव्हान गाठताना वेस्ट इंडिजने १३ षटकांत १ बाद ५७ धावा अशी मजल मारली होती. पण पूनम यादवच्या प्रभावी माऱ्यासमोर त्यांची अवस्था १७व्या षटकांत ५ बाद ६७ अशी झाली. मात्र हेली मॅथ्यूज (२५) आणि चिनले हेन्री (१७) यांनी कडवा प्रतिकार करत वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या.

अखेरच्या षटकात ११ धावांची आवश्यकता असताना पूनमने मॅॅथ्यूजला चौथ्या चेंडूत बाद केले. अखेरच्या चेंडूवर तीन धावा हव्या असताना पूनमने हेन्रीला माघारी पाठवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ८ बाद १०७ (शिखा पांडे २४, अनिसा मोहम्मद २/१६) विजयी विरुद्ध वेस्ट इंडिज : २० षटकांत ७ बाद १०५ (ली-अ‍ॅन किर्बे ४२, पूनम यादव ३/२०).