News Flash

महिला आशिया चषक टी-२० – भारतीय महिलांचं स्वप्न भंगलं, अंतिम फेरीत बांगलादेश ३ गडी राखून विजयी

भारताने दिलेलं आव्हान ३ गडी राखून पूर्ण करत बांगलादेशने विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.

अंतिम फेरीत विजयानंतर जल्लोष करताना बांगलादेशी महिला

मलेशियात सुरु असलेल्या महिलांच्या आशिया चषकात आज बांगलादेशच्या महिला संघाने इतिहासाची नोंद केली. सहा वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघावर बांगलादेशने मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशने याच स्पर्धेत भारताला साखळी फेरीतही पराभवाचा धक्का दिला होता. भारतीय महिलांचं गचाळ क्षेत्ररक्षण आजच्या सामन्यात बांगलादेशच्या पथ्यावर पडलं. बांगलादेशकडून रुमाना अहमदने अष्टपैलू खेळ करत सामनावीराचा किताब पटकावला.

बांगलादेशने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मात्र भारताच्या पहिल्या फळीतल्या फलंदाज संघाला मजबूत सुरुवात करुन देऊ शकल्या नाहीत. ठराविक अंतराने विकेट पडत गेल्यामुळे भारतीय डावात मोठी भागीदारी रचलेली पहायला मिळाली नाही. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरने एका बाजूने किल्ला लढवत ठेवत आपलं अर्धशतक साजरं केलं. हरमनप्रीतच्या खेळीत ७ चौकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावरच भारताने २० षटकांमध्ये ११२ धावांचा पल्ला गाठला.

भारताने दिलेल्या ११३ धावांचा पाठलाग करताना, बांगलादेशी महिलांनीही ठराविक अंतराने विकेट फेकायला सुरुवात केली. मात्र यादरम्यान झालेल्या छोटेखानी भागीदाऱ्यांमुळे बांगलादेशच्या संघाने सामन्यावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. अखेर भारताने दिलेलं आव्हान ३ गडी राखून पूर्ण करत बांगलादेशने विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.

संक्षिप्त धावफलक – भारत २० षटकांत ११२/९, हरमनप्रीत कौर ५६, रुमाना अहमद २/२२ विरुद्ध बांगलादेश निगारा सुलताना २७, रुमाना अहमद २३, पूनम यादव ४/९ निकाल – बांगलादेश सामन्यात ३ गडी राखून विजयी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2018 3:48 pm

Web Title: womens asia cup bangladesh pull off thrilling last ball finish to register historic win over india
टॅग : Bangladesh
Next Stories
1 कामगाराच्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरसावले, नेमबाजी विश्वचषकासाठी आर्थिक मदत
2 इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय क्रिकेटपटूंची यो-यो टेस्ट; अनफिट खेळाडूंना डच्चू मिळणार?
3 सचिनच्या सल्ल्यानुसार विश्वचषकाच्या अंतिम फेरीत युवराजआधी धोनीला संधी – विरेंद्र सेहवाग
Just Now!
X