महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांनी चीनवर ४-१ अशी मात केली. या स्पर्धेतला भारतीय महिलांचा हा सलग दुसरा विजय ठरला. ‘अ’ गटात झालेल्या सामन्यात गुरजित कौर (१९ वे मिनीट), नवजोत कौर (४९ वे मिनीट), नेहा गोयल (४९ वे मिनीट) आणि कर्णधार राणी रामपालने ५८ व्या मिनीटाला गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी सिंगापूरचा १०-० असा धुव्वा उडवला होता. चीनविरुद्धच्या सामन्यात १५ व्या भारतीय महिलांना पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र यात भारतीय महिलांना अपयश आलं. यानंतरही पहिल्या सत्रात भारताला गोल करण्याच्या अनेक संधी आल्या, मात्र भारतीय महिलांना या संधीचं सोनं करता आलेलं नाही.

अखेर १९ व्या मिनीटाला ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने गोल करत भारतीय संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर तिसऱ्या सत्रात नवजोत कौरने भारताकडून पुन्हा एकदा गोल करत आपल्या संघाची आघाडी भक्कम केली. मात्र ३८ व्या मिनीटाला चिनी खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नवर गोल करत भारताची आघाडी २-१ अशी कमी केली. यानंतर चिनी खेळाडूंनी भारताची बचावफळी भेदत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. मात्र भारतीय खेळाडूंनी चिनी खेळाडूंचे मनसुबे धुळीला मिळवले.

यानंतर भारतीय महिलांनी सामन्यात मागे वळून न पाहता लागोपाठ गोल करत, चीनला बॅकफूटवर ढकललं. या स्पर्धेत भारतीय महिलांचा शेवटचा साखळी सामना उद्या मलेशियाच्याविरुद्ध आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवत भारतीय महिला आपलं पहिलं स्थान कायम राखतात का हे पहावं लागेल.

अवश्य वाचा – सुलतान जोहर चषक हॉकीत भारताला कांस्यपदक, मलेशियावर ४-० ने मात