बांगलादेशविरुद्ध पराभवाचा झटका बसल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषकात दमदार पुनरागमन केलं आहे. श्रीलंकेच्या संघावर ७ गडी राखून मात करत भारतीय महिलांनी स्पर्धेतला आपला तिसरा विजय नोंदवला. या विजयासह भारतीय महिलांचं अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या शक्यता अजुनही कायम आहेत. डावखुरी फिरकीपटू एकता बिश्तची अष्टपैलू कामगिरी आणि इतर गोलंदाजांनी तिला दिलेली साथ हे आजच्या दिवसाच्या खेळाचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलं.

मिताली राजने २० धावात २ बळी घेत २ श्रीलंकन फलंदाजांना धावचीत करुन माघारी धाडलं. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळे श्रीलंकेचा संघ १०७ धावांवर आटोपला. श्रीलंकेने दिलेल्या १०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने डावाची आक्रमक सुरुवात केली. मात्र ठराविक अंतरानंतर भारताच्या ३ फलंदाज माघारी परतल्या. ७०/३ या धावसंख्येवरुन वेदा कृष्णमुर्ती आणि अनुजा पाटील यांनी नाबाद ४० धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

४ सामन्यांनंतर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या संघाचे ६ गुण झालेले आहेत. मात्र भारतीय संघ सरस धावगतीच्या जोरावर पहिल्या क्रमांकावर आहे. शनिवारी भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

संक्षिप्त धावफलक – श्रीलंका २० षटकांत १०७/७ (हसिनी पेरेरा ४६, एकता बिश्त २/२०) विरुद्ध भारत ११०/३ (वेदा कृष्णमुर्ती २९, ओशादी रणसिंघे १/१५) निकाल – भारत ७ गडी राखून विजयी