महिलांच्या तिरंगी ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. एलिस पेरीने (४ बळी आणि ४९ धावा) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला चार गडी आणि सात चेंडू राखून पराभूत केले.

पहिल्या लढतीत इंग्लंडला नमवणाऱ्या भारताला या सामन्यात त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे जमले नाही. प्रथम फलंदाजी करताना भारत २० षटकांत ९ बाद १०३ धावांपर्यंतच मजल मारू शकला. पेरीने १३ धावांत चार बळी घेत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले. भारताकडून स्मृती मनधाना  (३५), कर्णधार हरमनप्रीत कौर (२८) आणि १०व्या क्रमांकाची फलंदाज राधा यादव (११) या तिघींनाच दोन आकडी धावा करता आल्या. विजयासाठीचे १०४ धावांचे माफक आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियाचीसुद्धा एकवेळ ३ बाद ३० अशी घसरगुंडी उडाली होती. परंतु २९ वर्षीय पेरीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४९ धावांची झुंजार खेळी साकारून ऑस्ट्रेलियाला १९व्या षटकात विजयी धावसंख्या गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

तिरंगी मालिकेत सध्या तिन्ही संघांचे (भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड) प्रत्येकी दोन सामन्यांतील एका विजय-पराजयासह दोन गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलिया निव्वळ धावगतीच्या आधारावर पहिल्या स्थानी आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्पर्धेत भारताची पुढील लढत ७ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ९ बाद १०३ (स्मृती मानधना ३५, हरमनप्रीत कौर २८; एलिस पेरी ४/१३) पराभूत ऑस्ट्रेलिया : १८.५ षटकांत ६ बाद १०४ (एलिस पेरी ४९, अ‍ॅश्ले गार्डनर २२; राधा गायकवाड २/१८).

* सामनावीर : एलिस पेरी