ऑस्ट्रेलियातील महिला टी-२० विश्वचषकात भारतीय महिला संघाने धडाकेबाज कामगिरी केली. या स्पर्धेत भारतीय संघाची सलामीवीर शफाली वर्माने सर्वांनी मनं जिंकून घेतली. भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात शफाली वर्माचा मोठा वाटा आहे. १६ वर्षीय शफाली वर्माने आपल्या छोटेखानी खेळीत आक्रमक फटकेबाजी करत आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं. हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातून आलेल्या शफालीचा आतापर्यंत संघर्ष हा नक्कीच वाखणण्याजोगा आहे. अंतिम फेरीआधी आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत शफालनी आपला संघर्ष उलगडवून दाखवला.

“शफालीच्या वडिलांना क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड होती. हीच आवड आपल्या मुलामध्ये निर्माण व्हावी यासाठी शफाली आणि तिच्या भावाला वडिल मैदानात सरावासाठी न्यायचे. सुरुवातीला शफालीला फक्त आपल्या भावाने मारलेले बॉल उचलणं एवढच काम होतं. मात्र एक दिवस शफालीच्या वडिलांनी तिला सराव करण्याची संधी देत तिच्यातले गूण हेरले. यानंतर आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शफालीने सराव सुरु केला. भारतात आजही महिला क्रिकेट क्लबची संख्या ही फार थोडी असल्यामुळे तिला मुलांसोबत सराव करावा लागायचा. मुलांसोबत खेळताना आपण त्यांच्यातलंच एक व्हावं यासाठी शफालीने आपले केसही कापले. इतकच काय तर एकदा आपल्या आजारी भावाच्या जागी मैदानात खेळत तिने मालिकावीराचा किताबही पटकावला होता”, आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत शफाली बोलत होती.

भारतीय संघात शफालीला स्थान मिळाल्यानंतर, संघाचं रुपडंच बदललं आहे. स्मृती मंधानाच्या सोबत शफाली वर्माने फटकेबाजी करत भारताला सर्वोत्तम सुरुवात करुन दिली आहे. तिचा हा खेळ पाहून अनेक गोलंदाज तिला गोलंदाजी करायला घाबरतात. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिलांनी केलेली कामगिरीही ही खरीच वाखणण्याजोगी आहे. त्यातच शफाली वर्माचा संघर्ष दाद देण्यासारखा आहे. त्यामुळे तिच्या संघर्षातून प्रेरणा घेत अशा अनेक शफाली वर्मा भारतात तयार होतील ही अपेक्षा आहे.