लंडन येथे सुरु असलेल्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिलांना आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सलामीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध अखेरच्या मिनीटांमध्ये कच खाल्ल्यामुळे भारतीय महिलांना १-१ अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं. मात्र बाद फेरीच्या दृष्टीने आगेकूच करण्यासाठी भारतीय संघाला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक होतं. मात्र संपूर्ण सामन्यात आयर्लंडचा बचाव भेदणं भारतीय महिलांना जमलं नाही. आयर्लंडने मात्र मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत १-० असा विजय मिळवत बाद फेरीमध्ये प्रवेश केला.

इंग्लंडविरुद्ध सामन्यात अखेरच्या क्षणी कच खालेल्या भारतीय संघाला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय आवश्यक होता. आयर्लंडचा संघ या स्पर्धेत गुणतालिकेत सध्या आघाडीवर आहे, आपल्या हाच फॉर्म कायम ठेवत आयर्लंडने आक्रमकपणे सुरुवात केली. आयर्लंडच्या खेळाडूंनी जलद चाली रचत भारतीय बचावफळीला खिंडार पाडलं. मध्यंतरीच्या वेळात भारतीय खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळाली होती, मात्र त्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करणं भारताला जमलं नाही. अखेर १२ व्या मिनीटाला आयर्लंडच्या अॅना ओफ्लानगनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.

सामन्यात आपलं आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघ दुसऱ्या सत्रात वेगळ्या रणनितीने मैदानात उतरणार अशी चिन्ह दिसतं होती. मात्र प्रत्यक्ष मैदानात आयर्लंडच्या बचावफळीने भारतीय खेळाडूंना चांगलचं झुंजवलं. दुसऱ्या सत्रातही भारतीय महिला पेनल्टी कॉर्नरवर गोल करु शकल्या नाहीत. रिना खोकर, गुरजीत या खेळाडूंनी आयर्लंडचा बचाव भेदण्याचा प्रयत्न केला, मात्र यात त्यांना यश आलं नाही. मध्यांतरापर्यंत आयर्लंडने सामन्यात १-० अशी आघाडी कायम राखली.

तिसऱ्या सत्रामध्येही भारतीय खेळाडूंनी आयर्लंडच्या गोलपोस्टवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र गोलकिपर ग्रेस ओफ्लानगन आणि बचावफळीने भारताचे सर्व हल्ले परतवून लावले. तिसऱ्या सत्रातही भारतीय महिलांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या संधी वाया घालवल्या. भारतीय खेळाडू करत असलेल्या क्षुल्लक चुका पाहून आयर्लंडच्या महिलांनीही आक्रमण न करता केवळ बचाव करण्यावर भर दिला. चौथ्या सत्रातही आयर्लंडचा बचाव भेदणं भारतीय महिलांना जमलं नाही. अखेर आयर्लंडने १-० च्या फरकाने सामन्यात बाजी मारत बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे.