लंडनमध्ये सुरु असलेल्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान अखेर आज संपुष्टात आलेलं आहे. आयर्लंडच्या संघाने भारतावर पेनल्टी शूटआऊटवर ३-१ ने मात केली. या स्पर्धेत आयर्लंडने भारतावर दुसऱ्यांदा मात केली आहे. संपूर्ण सामन्यात आयर्लंडला ०-० अशा बरोबरीत रोखलेल्या भारतीय महिलांना पेनल्टी शूटआऊटवर चांगला खेळ करता आला नाही. भारताकडून रिनाने एकमेव गोल केला. आयर्लंडने साखळी फेरीत पहिल्या सामन्यापासून आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. उपांत्य फेरीत आयर्लंडचा सामना स्पेनविरुद्ध होणार आहे.

साखळी फेरीत आयर्लंडविरुद्ध पराभवाचा धक्का सहन कराव्या लागलेल्या भारतीय महिला, उपांत्यपूर्व फेरीत सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या दिसत होत्या. दोन्ही संघातल्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात सावध पवित्रा घेतलेला पहायला मिळाला. यामुळे पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या नाहीत. दुसऱ्या सत्रात आयर्लंडच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी काही सुरेख चाली रचलेल्या पहायला मिळाल्या, मात्र भारतीय बचावफळीने त्यांचे मनसुबे उधळून लावले. भारतीय खेळाडूंनाही दुसऱ्या सत्रात गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या, मात्र त्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करणं भारतीय खेळाडूंना जमलं नाही. भारतीय कर्णधार राणी रामपालचेही दुसऱ्या सत्रातले काही चांगले प्रयत्न वाया गेल्यामुळे गोलपोस्टवरील कोंडी फुटू शकली नाही.

तिसऱ्या सत्रात आयर्लंडच्या खेळाडूंनी तुलनेने आक्रमक पवित्रा घेत भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र तुलनेत तिसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंचा खेळ बहरला नाही. भारतीय महिलांचे अनेक छोटे पास आयर्लंडच्या खेळाडूंनी अडवले. त्यामुळे गोल करण्याच्या संधी निर्माण करण भारतीय महिलांना जमलं नाही. मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय बचावफळीने आयर्लंडचं आक्रमण शिताफीने रोखून धरलं. दिप ग्रेस एक्काने तिसऱ्या सत्रात चांगला बचाव केला.

चौथ्या सत्रात भारतीय महिलांना पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र आयर्लंडच्या गोलकिपरने भारताचे मनसुबे उधळून लावले. चौथ्या सत्रातही भारतीय महिलांनी निराशाजनक खेळ केला. भारतीय महिलांच्या कित्येक संधी केवळ चेंडूवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे वाया गेल्या. मात्र चौथ्या सत्राच्या अखेरीसही कोणत्याही संघाला गोल करण्यास यश न आल्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटवर नेण्यात आला. या पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडने भारतावर ३-१ ने मात करत उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे.