गेल्या काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठीच्या आयपीएल स्पर्धेला अखेरीस गव्हर्निंग काऊन्सिलने मान्यता दिली आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी रविवारी गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडली, त्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा भरवली जाणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : स्पर्धेसाठी VIVO कंपनीची स्पॉन्सरशिप कायम, गव्हर्निंग काऊन्सिलचा निर्णय

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना महिला खेळाडूंसाठी आयपीएलचं आयोजन होणार असल्याची माहिती दिली होती. ४ संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार असून १ ते १० नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल. स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद व इतर बाबींचा अभ्यास केल्यानंतर आगामी काळात महिलांसाठीही आयपीएलचा पूर्ण हंगाम भरवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असल्याचं सौरव गांगुलीने सांगितलं.