हरमनप्रीत कौर आणि मिताली राज यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे. परंतू अनेक भारतीय महिला खेळाडूंना असणारा कमी अनुभव यामुळे अद्याप महिला संघाला एकाही महत्वाच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. २०२० सालात फेब्रुवारी महिन्यात हरमनप्रीत कौरचा भारतीय संघ महिला टी-२० विश्वचषकात उप-विजेता ठरला होता. अनेक भारतीय महिला खेळाडूंनी आयपीएलसारख्या स्पर्धेची गरज असल्याचं बोलून दाखवलं होतं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानेही महिला खेळाडूंसाठी आयपीएलची घोषणा लवकरच होईल अशी माहिती दिली आहे.

“मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू शकतो की महिलांसाठी आयपीएलवरही आमचा विचार सुरु आहे, लवकरच याची घोषणा होईल. भारतीय महिला संघासाठीही आम्ही काही प्लान आखले आहेत.” गांगुलीने पीटीआयला माहिती दिली. सध्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला सौरव गांगुली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे. या कारणासाठी गांगुलीने याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला. परंतू बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १ ते १० नोव्हेंबरदरम्यान महिला खेळाडूंसाठी चॅलेंजर सिरीजचं आयोजन केलं जाऊ शकतं.

सध्या बीसीसीआयचं क्रिकेट ऑपरेशन्स विभाग भारतीय महिला संघासाठी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांसोबत मर्यादीत षटकांची मालिका आयोजित करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. त्यामुळे भविष्यकाळात बीसीसीआय महिला आयपीएलबद्दल काय घोषणा करतं याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असेल.