जयपूर : सुपरनोव्हाजने दिलेले १४२ धावांचे आव्हान गाठता न आल्याने व्हेलॉसिटी संघ महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज लीगमध्ये १२ धावांनी पराभूत झाला. मात्र अपेक्षित धावगती राखल्याने व्हेलॉसिटी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता अंतिम फेरीत पुन्हा याच दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे.

व्हेलॉसिटी संघाला २० षटकांमध्ये ३ बाद १३० धावाच करता आल्या. कर्णधार मिताली राज ४० धावा काडून नाबाद राहिली. व्हेलॉसिटी संघाच्या डावाचा प्रारंभ डळमळीत झाला. सलामीवीर शेफाली वर्माला राधा यादवने अवघ्या दोन धावांवर त्रिफळाचीत करीत माघारी धाडले. त्यानंतर मात्र डॅनियल वॅट आणि कर्णधार मिताली यांनी ५६ धावांची भागीदारी केली. वॅट फटकेबाजीच्या प्रयत्नात ३३ चेंडूंमध्ये ४३ धावांवर बाद झाली. मग मितालीने अखेपर्यंत मैदानात नाबाद राहून ४२ चेंडूत ४० धावा केल्या.

त्यापूर्वी, सुपरनोव्हाजकडून प्रिया पुनिया (१६) आणि चामरी अटापटू यांनी सावध सुरुवात केली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जने (७७) आतषबाजी करीत चामरीसोबत ४५ धावांची भागीदारी केली. अमेलिया केरच्या गोलंदाजीवर  चामरीला (३१) यष्टीरक्षक सुषमा वर्माने यष्टीचित केले. मग जेमिमाने सोफी डिव्हाइनच्या साथीने ५० धावांच्या भागीदारीसह संघाला १४२ धावांचा पल्ला गाठून दिला.

संक्षिप्त धावफलक

सुपरनोव्हाज : २० षटकांत ३ बाद १४२ (जेमिमा रॉड्रिग्ज ७७, चामरी अटापटू ३१; अ‍ॅमेलिया केर २/२१) विजयी वि. व्हेलॉसिटी : २० षटकांत ३ बाद १३० (डॅनियल वॅट ४३, मिताली राज ४०; पूनम यादव १/१३)

जेमिमा रॉड्रिग्ज

७७

चेंडू     ४८

चौकार  १०

षटकार  १