२०२२ साली बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये महिला टी-२० क्रिकेटच्या समावेशावर मोहर उमटवली गेली आहे. आयसीसीने यासंदर्भातल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामुळे तब्बल २४ वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. याआधी १९९८ साली झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.

काही महिन्यांपूर्वी आयसीसीने महिला टी-२० क्रिकेटचा बर्मिंगहॅम राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभाग व्हावा यासाठी अर्ज दाखल केला होता. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने हे पाऊल उचललं होतं. राष्ट्रकुल क्रीडा परिषदेने आयसीसीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर क्रिकेटचा २०२२ राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये अधिकृतरित्या समावेश करण्यात आला आहे. आयसीसीनेही राष्ट्रकुल क्रीडा परिषदेच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.