Women’s T20 World Cup 2020 Ind vs Eng : टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे एकही चेंडूचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले होते. तर इंग्लंडने ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. यासह भारतीय महिला संघाने सामना न खेळूनही एक इतिहास रचला.

World Cup 2020 : पावसाने काढली इंग्लंडची विकेट; भारत प्रथमच अंतिम फेरीत

भारतीय संघाने महिला टी २० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम रचला. या आधी २०१८ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडनेच पराभूत केले होते. त्यानंतर अनुभवी फलंदाज मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यात वाद चर्चेचा विषय ठरला होता. पण यंदाच्या स्पर्धेत मात्र सामना न खेळताच भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं.

भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार म्हणून मोठ्या संख्येने चाहतावर्ग सामन्यासाठी उपस्थित होता. भारताने साखळी फेरीत आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीचे तिकीट पटकावणारा भारत स्पर्धेतील पहिला संघ ठरला होता. याऊलट इंग्लंडला साखळी फेरीत एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण इतर सामन्यांत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली. तशातच यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघ अजिंक्य होता, पण इंग्लंडने २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ तसेच २०१८च्या विश्वचषकात भारताला हरवले होते. त्यामुळे उपांत्य फेरीत कोणता संघ वरचढ ठरतो? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पण अखेर पावसामुळे सामना होऊ शकला नाही आणि इंग्लंडच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले.