Women’s T20 World Cup 2020 IND vs AUS : फिरकीपटू पूनम यादवचे चार बळी आणि यष्टीरक्षक तानिया भाटियाची दमदार कामगिरी याच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी पराभूत केले. जेमायमा रॉड्रीग्ज (२६) आणि दिप्ती शर्मा (४९*) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी केली, पण पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले.

तानिया भाटिया

ऑस्ट्रेलियाच्या १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीरांनी सावध सुरूवात केली. पण संयमी सुरूवातीनंतर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. पाठोपाठ कर्णधार मेग लॅनिंगदेखील स्वस्तात माघारी परतली. राजश्री गायकवाडच्या गोलंदाजीवर तानियाने तिला झेलबाद केले. त्यानंतर फिरकीपटू पूनम यादवच्या गोलंदाजीवर रॅचेल हेन्सला स्टंपिंग केले. तिच्याच गोलंदाजीवर तानियाने जोनासन हिलाही झेल टिपत माघारी पाठवले. तर शिखा पांडेच्या गोलंदाजीवर तानियाने सदरलँडला स्टंपिंग केले.

तानियाने या कामगिरीसह सर्वाधिक टी २० स्टंपिंगच्या यादीत सारा टेलर आणि अलिसा हेली या दोघींच्या पाठोपाठ तिसरा क्रमांक पटकावला. सध्या इंग्लंडची सारा टेलर ५१ स्टंपिंगसह पहिल्या तर ऑस्ट्रेलियाची अलिसा हेली ४५ स्टंपिंगसह दुसऱ्या स्थानी आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाला २० षटकात केवळ ११५ धावाच करता आल्या. त्याआधी भारताकडून आपला पहिला टी २० विश्वचषक सामना खेळणाऱ्या शफाली वर्माने धमाकेदार खेळी करत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तिने १५ चेंडूत २९ धावा केल्या. तिच्याशिवाय मुंबईकर रॉड्रीग्जने दिप्ती शर्मासोबत सावध खेळ केला. त्या दोघींनी डावाला आकार दिला. पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात अखेर रॉड्रीग्ज माघारी परतली. तिने ३३ चेंडूत २६ धावा केल्या. दिप्ती शर्माने मात्र शेवटपर्यंत झुंज दिली आणि नाबाद ४९ धावा केल्या.