यजमान विंडीजला पराभवाचा धक्का देत ऑस्ट्रेलियन महिला संघाने कॅरेबियन बेटांवर सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ७१ धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीतलं आपलं तिकीट नक्की केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन वर्षांपूर्वी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विंडीजकडून स्विकाराव्या लागलेल्या पराभवाचाही बदला घेतला.

अलिसा हेली (४६ धावा) आणि मेग लेनिंग (३१ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकांमध्ये ५ विकेटच्या मोबदल्यात १४२ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीमध्ये ५१ धावांची भागीदारीही झाली. तळातल्या फळीतील फलंदाज रिचेल हेनसनेही फटकेबाजी करत नाबाद २५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानावर उतरलेल्या विंडीजच्या महिलांची फलंदाजी आजच्या सामन्यात पुरती ढेपाळली.

दुसऱ्या षटकात हेली मॅथ्यूज धावबाद होऊन माघारी परतल्यानंतर, ठराविक अंतराने विंडीजच्या फलंदाज माघारी परतत राहिल्या. यानंतर ऑस्ट्रेलियान महिलांनी शिस्तबद्ध मारा करत विंडीजला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. एका क्षणाला विंडीजची सामन्यात ४५/६ अशी अवस्था झाली होती. विंडीजकडून कर्णधार स्टेफनी टेलरला दोन आकडी धावसंख्या गाठता आली. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरी, गार्डनस आणि किमीन्स यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.