न्यूझीलंडविरुद्ध तिसरी लढत आज मेलबर्नमध्ये

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचे आव्हान सहजपणे चिरडून टाकल्यानंतर आता महिला ट्वेटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष लागले आहे. भारतीय महिलांचा तिसरा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध मेलबर्नमध्ये रंगणार आहे.

भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी आणि बांगलादेशचा १८ धावांनी पराभव करत सलग दोन विजयांची नोंद केली. त्यामुळे भारताने अ-गटात ४ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. न्यूझीलंडवरील विजयाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिलांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल.

गेल्या दोन्ही सामन्यांत भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर जबरदस्त कामगिरी केली आहे. १६ वर्षीय शफाली वर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वाची मने जिंकली आहेत. तिने बांगलादेशविरुद्ध १७ चेंडूंत ३९ तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९ धावा फटकावल्या होत्या. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर जेमिमा रॉड्रिग्ज हिनेही २६ आणि ३४ धावा करत छाप पाडली आहे. फक्त हरमनप्रीतला मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. तापामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागलेल्या स्मृती मानधनाच्या समावेशामुळे आता भारताची फलंदाजी अधिकच मजबूत झाली आहे. मधल्या फळीत दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्ती यांनीही भारताच्या विजयात योगदान दिले आहे. गोलंदाजीत लेग-स्पिनर पूनम यादवने आपल्या फिरकीच्या तालावर सर्वानाच नाचवले असून तिने दोन सामन्यांत सात बळी मिळवले आहेत. वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिनेही  पाच बळी टिपत तिला चांगली साथ दिली आहे.

न्यूझीलंड संघात अव्वल खेळाडूंचा भरणा असून त्यांची भिस्त कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सोफी डिव्हाइन, अव्वल फलंदाज सुझी बेट्स तसेच वेगवान गोलंदाज ली ताहूहू आणि फिरकीपटू अमेलिया केर यांच्यावर असेल. न्यूझीलंडने शनिवारी श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. डिव्हाइनने नाबाद ७५ धावांची खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला होता.

संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, पूनम यादव, राधा यादव, तानिया भाटिया, हरलीन देवल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार.

न्यूझीलंड : सोफी डिव्हाइन (कर्णधार), रोझमेरी मेयर, अमेलिया केर, सुझी बेट्स, लॉरेन डाऊन, मॅडी ग्रीन, हॉली हडलसन, हेली जेन्सन, लाय कास्पेरेक, जेस केर, कॅटी मार्टिन, केटी पेर्किन्स, अ‍ॅना पीटरसन, रचेल प्राएस्ट, ली तुहूहू.

सामन्याची वेळ : सकाळी ९.३०

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी