ऑस्ट्रेलियन महिला संघाची सलामीवीर आणि यष्टीरक्षक एलिसा हेलीने अंतिम सामन्यात विक्रमी कामगिरी केली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिलांनी चौफेर फटकेबाजी करत खोऱ्याने धावा वसूल केल्या. एलिसा हेली आणि बेथ मुनी या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली.

हेलिने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. या अर्धशतकी खेळाच्या जोरावर हेलीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ७५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत हेलीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिने न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक ब्रँडन मॅक्युलमचा विक्रम मोडला.

सुरुवातीच्या षटकांमध्ये केलेली फटकेबाजी पाहता ऑस्ट्रेलियन महिला २०० धावांचा टप्पा ओलांडणार असं वाटत होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत महत्वाचे बळी घेत ऑस्ट्रेलियन महिलांना १८४ धावांवर रोखलं.

अवश्य वाचा – T20 World Cup Final : एलिसा हेलीचा दाणपट्टा, भारतीय महिलांना चोपलं