महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. रविवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ विजेतेपदासाठी समोरासमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यासाठी देशभरातून हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला क्रिकेट संघाला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी अंतिम सामन्याआधी नरेंद्र मोदींना ट्विट करत वातावरण निर्मिती केली. या ट्विटमध्ये मॉरिसन यांनी हा सामना ऑस्ट्रेलियाच जिंकणार असंही म्हटलं.

नरेंद्र मोदींनीही मॉरिसन यांच्या उत्तराला आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं. भारतीय महिला संघाला शुभेच्छा देताना मोदींनी मॉरिसन यांना कोपरखळी देत भारतीय महिला अंतिम सामन्यात इतिहास घडवतील असा विश्वास व्यक्त केला.

संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावलेला नाही. शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमायमा रॉड्रिग्ज, राधा यादव, पूनम यादव, शिखा पांडे यांच्यावर प्रामुख्याने भारताची मदार असेल. ऑस्ट्रेलियसमोर भारताच्या फिरकी गोलंदाजांचे आव्हान असेल.