ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या तिरंगी टी-२० मालिकेत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. मराठमोळ्या स्मृती मंधानाने झळकावलेलं अर्धशतक व तिला इतर फलंदाजांनी दिलेली सर्वोत्तम साथ या जोरावर भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाने दिलेलं १७४ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. ७ विकेट राखत भारतीय महिलांनी हा सामना जिंकला.

नाणेफेक जिंकत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट झटपट घेण्यात भारतीय गोलंदाज यशस्वीही झाल्या. मात्र यानंतर बेथ मुनी आणि अ‍ॅश्ले गार्डनरने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत धावसंख्येला आकार दिला. दरम्यान मुनीला माघारी धाडण्यात भारताला यश आलं, मात्र गार्डनरने एक बाजू लावून धरत चांगली फटकेबाजी केली. मैदानात चौफेर फटकेबाजी करताना गार्डनरने ९३ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७३ धावांचा पल्ला गाठला.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघातील महिलांनी चांगली सुरुवात केली. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. एलिस पेरीने शेफाली वर्माला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. शेफाली वर्मा ४९ धावा काढून माघारी परतली. दुसऱ्या बाजूने स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करत अर्धशतक झळकावलं. ५५ धावांची खेळी करुन मंधाना माघारी परतली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा जोडीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.