भारत-इंग्लंड महिला कसोटी

ब्रिस्टल : स्नेह राणाच्या झुंजार नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णीत राखली. राणाने (१५४ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ८०) तानिया भाटियाच्या साथीने नवव्या गडय़ासाठी १०४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात १२१ षटकांत ८ बाद ३४४ धावा करता आल्या. भाटियाने नाबाद ४४ धावा केल्या. त्याआधी सलग दुसरे अर्धशतक झळकावणारी शफाली वर्मा ६३ धावांवर बाद झाल्यानंतर दीप्तीने पूनम राऊतसह (३९) तिसऱ्या गडय़ासाठी ७२ धावांची भागीदारी केली. पण सोफी एस्सेलस्टोनने दीप्तीचा (५४) अडसर दूर केल्यानंतर कर्णधार मिताली राज (४) आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर (८) यांनी निराशा केली.