ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिरंगी महिला टी-२० मालिकेत भारतीय महिलांच्या पदरी आणखी एक पराभव पडला आहे. इंग्लंडने भारतीय महिलांवर ४ विकेट राखत मात केली आहे. भारतीय महिलांनी विजयासाठी दिलेलं १२४ धावांचं आव्हान इंग्लंडच्या महिला संघाने नतालिया स्किवरच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं.

इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या जोडीने भारतीय संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र शेफाली वर्मा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. ३९ धावांची भागीदारी झाल्यानंतर शेफाली ८ धावा करत माघारी परतली. एस्कलस्टोनने तिचा त्रिफळा उडवला. यानंतर दुसऱ्या बाजूने स्मृती मंधानाने संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ती देखील ठराविक अंतराने माघारी परतली. ४५ धावांवर कॅथरिन ब्रंटने स्मृती मंधानाला माघारी धाडलं. यानंतर भारतीय महिला फलंदाज मोठी भागीदारी रचण्यात अपयशी ठरल्या. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे, भारतीय महिलांचा संघ १२३ धावांपर्यंत मजल मारु शकला. इंग्लंडकडून अ‍ॅना श्रबसोलने ३, कॅथरिन ब्रंटने २ तर सोफी एस्कलस्टोनने १ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या महिला संघाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. सलामीच्या ३ फलंदाज अवघ्या २८ धावांत माघारी परतल्या. मात्र कर्णधार हेदर नाईट आणि नतालिया स्किवरने चौथ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. कर्णधार हेदर नाईटला माघारी धाडण्यात भारतीय महिला यशस्वी ठरल्या, मात्र दुसऱ्या बाजूने नतालिया स्किवरने धडाकेबाज फलंदाजी करताना आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तिने ३८ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. राजेश्वरी गायकवाडने स्किवरला आपल्याच गोलंदाजीवर माघारी धाडलं खरं, मात्र तोपर्यंत सामना भारतीय महिलांच्या हातून निसटला होता. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने ३ तर राधा यादवने एक बळी घेतला. इंग्लंडच्या दोन फलंदाज धावबाद झाल्या.