गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. आता आयसीसी महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कामगिरीत सातत्य राखण्याचे उद्दिष्ट हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बाळगले आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास, भारताने बाद फेरीच्या दिशेने मजबूत दावेदारी करता येईल.

लेगस्पिनर पूनम यादवच्या जादुई गोलंदाजीमुळे भारताने सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पाडाव केला. मात्र भारतीय महिला संघाने सलग दुसरा विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले असले तरी त्यांना बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. २०१८च्या ट्वेन्टी-२० आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशने भारताला दोन वेळा धूळ चारली आहे.

जेमिमा रॉड्रिग्ज आणि १६ वर्षीय युवा फलंदाज शफाली वर्मा या तेव्हा आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात नव्हत्या. पण त्यांच्या आगमनाने भारताची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. मात्र भारताला फलंदाजीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय फलंदाजांना १३२ धावाच जमवता आल्या होत्या. विश्वचषकाआधी झालेल्या तिरंगी मालिकेतही भारतीय फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आले नव्हते.

कर्णधार हरमनप्रीत आणि सलामीवीर स्मृती मानधना यांना गेल्या सामन्याप्रमाणे फलंदाजीत योगदान द्यावे लागेल. मधल्या फळीतील दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ४९ धावांची खेळी केली, ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणता येईल. गेल्या काही सामन्यांत मधली फळी ढेपाळली असताना दीप्तीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर गवसला. मध्यमगती गोलंदाज शिखा पांडे हिनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती.

बांगलादेशकडे जहानारा आलम आणि फरगना हक यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. २६ वर्षीय फरगनाने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या नावावर शतक झळकावले आहे. कर्णधार सलमा खातून ही सर्वात अनुभवी क्रिकेटपटू त्यांच्याकडे आहे.

५ भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत झालेल्या पाच लढतींपैकी भारताने तीन तर बांगलादेशने दोन सामन्यांत विजय मिळवला आहे.

संघ

* भारत महिला : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, पूनम यादव, राधा यादव, तानिया भाटिया, हरलीन देवल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार.

* बांगलादेश : सलमा खातून (कर्णधार), रुमाना अहमद, आयशा रहमान, फहिमा खातून, फरगाना हक, जहानारा आलम, खादिजा तुल कुबरा, शोभना मोस्तारी, मुर्शिदा खातून, नाहिदा अक्तेर, निगर सुलताना, पन्ना घोष, रितू मोनी, संजिदा इस्लाम, शमिमा सुलताना.

* सामन्याची वेळ : दुपारी ४.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने हुरळून जाण्याची गरज नाही. आम्हाला बांगलादेशविरुद्धच्या लढतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. भारतीय फलंदाजांना पुरेशा धावसंख्या उभाराव्या लागतील, जेणेकरून गोलंदाजांनाही आपली कामगिरी चोखपणे निभावणे सोपे जाईल. भारताची गोलंदाजी उत्तम होत असली तरी फलंदाजांनीही कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे.

– वेदा कृष्णमूर्ती, भारताची फलंदाज