Women’s World Boxing Championships : भारताची सुवर्णपदक विजेती महिला मुष्टियोद्धा सरिता देवी आणि नवोदित महिला मुष्टियोद्धा मनीषा मौन यांनी AIBA महिला विश्व चॅम्पियनशिपच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. केडी जाधव सभागृहात झालेल्या सामन्यात त्यांनी आपला विजय नोंदवला.

६० किलो वजनी गटात सरिताने स्वित्झर्लंडच्या डायना सॅन्ड्रा ब्रुगर हीचा ४-० असा पराभव केला. सरिताने सामन्यात पूर्ण वेळ वर्चस्व राखले होते. पुढच्या फेरीत सरिताला १८ नोव्हेंबर रोजी आयर्लंडच्या एने हॅरिंगटनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हॅरिंगटनने न्यूझीलंडच्या ट्राय गार्टनचा पराभव केला होता.

मनीषाने ५४ किलो वजनी गटात पहिल्या फेरीत अमेरिकेची अनुभवी व २०१६ विश्व स्पर्धेतील कांस्यपदक विजेती क्रिस्टिना क्रुजचा ५-० ने शानदार पराभव केला. युवा मनीषासाठी हा विजय महत्त्वाचा होता, कारण तिला पहिल्याच फेरीत विश्व चॅम्पियनशिप पदकविजेत्या क्रिस्टिनाविरुद्ध खेळावे लागले होते. मनीषाला आता उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी १८ नोव्हेंबरला कजाकस्तानच्या डिना जोलामॅनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जोलामॅनने मिजुकी हिरुताचा ४-१ ने पराभव केला होता.