मार्टा हिने विक्रमी कामगिरी करताना महिला विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत ब्राझील संघाला दक्षिण कोरियावर
२-० असा विजय मिळवून दिला. मार्टाने दुसऱ्या सत्रात पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून विश्वचषक स्पध्रेत सर्वाधिक १५ गोल करण्याचा मान पटकावला.  फ्रान्सने कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडवर १-० अशा विजयाची नोंद केली.
ब्राझील आणि दक्षिण कोरिया यांच्यातील लढतीत फॉर्मिगाने ३३व्या मिनिटाला गोल करून ब्राझिलला आघाडी मिळवून दिली. ३७ वर्षीय फॉर्मिगा विश्वचषकाच्या इतिहासात गोल करणारी सर्वात वयस्कर खेळाडू ठरली.  ५३व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर मार्टाने गोल करून ही आघाडी २-० अशी मजबूत केली आणि ती अखेपर्यंत कायम राखत विजय निश्चित केला.
तत्पूर्वी, ‘फ’ गटातील लढतीत फ्रान्सने इयुगेनीए ली सोमरने २९व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर इंग्लंडचा १-० असा पराभव केला.