क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने भारतीय महिला संघ मैदानात उतरला आहे. भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषकातील कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ऑस्ट्रेलियाविरुद्दचा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर सोशल मिडियावरील महिला खेळाडूंवर होणारा कौतुकाचा वर्षाव अधिक वाढला आहे. अंतिम सामन्यात भारत पुन्हा एकदा दमदार खेळी करेल, अशी आस तमाम भारतवासियांना आहे. भारतीय पुरुष संघानी क्रिकेटर्संना दिलेल्या शुभेच्छानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींनी संघातील अकरा खेळाडूंसाठी अकरा ट्विटकरुन खास शुभेच्छा दिल्या आहेत.
मोदींनी एकूण महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना बारा ट्विट केली आहेत. यात पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, भारतीय संघ विश्वचषकातील अंतिम सामना खेळत आहे. १२५ कोटी जनतेसोबत माझ्या देखील त्यांना शुभेच्छा!

त्यानंतर त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये भारतीय संघाची कर्णधार मिताली राजसाठी ट्विट केले आहे. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे, तिच्या कुल अंदाजाने भारतीय संघ अंतिम सामन्यात भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी ट्विमधून व्यक्त केलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्धची हरमनप्रीतने केलेली खेळी अविस्मरणीय होती. या सामन्यातही तिचा असाच खेळ पाहायला मिळेल. असेही ट्विट त्यांनी केलंय. प्रत्येक खेळाडूच्या विशेष कामगिरीची दखल घेत त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.