पहिल्याच दिवशी भारतीय संघासमोर बलाढय़ न्यूझीलंडचे आव्हान

सध्या संपूर्ण भारतात फटाके आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यास मिळत आहे. एकीकडे वेस्ट इंडिज क्रिकेट संघावर वर्चस्व गाजवत असलेल्या भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघाप्रमाणेच आता महिला संघही थेट वेस्ट इंडिजलाच जाऊन विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत.

शुक्रवार, ९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला विश्वचषक टे्वन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आनंद लुटण्यासाठी संपूर्ण जग तयार झाले असून भारत-न्यूझीलंड असे दोन बलाढय़ संघ पहिल्याच लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासमोर प्रमुख आव्हान असेल ते म्हणजे अनुभवी झुलन गोस्वामीच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजांकडून प्रदर्शन घडवून घेणे. २००९ आणि २०१०च्या विश्वचषकात भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, मात्र भारताला अद्याप एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे यंदा अंतिम फेरीसहच विश्वविजेतेपद पटकावण्याचेही भारतीय महिलांचे लक्ष्य असणार आहे.

‘ब’ गटात समावेश असलेल्या भारताला पुढील साखळी लढतीत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांचासुद्धा सामना करायचा आहे. त्यामुळए, न्यूझीलंडला पराभूत करून स्पर्धेची दमदार सुरुवात करण्यासाठी भारत सज्ज आहे. फलंदाजीत भारताची मदार अनुभवी मिताली राज, धडाकेबाज स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर असणार आहे.

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), मिताली राज, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम यादव, वेदा कृष्णमूर्ती, एकता बिश्त, अनुजा पाटील, दिप्ती शर्मा, मानसी जोशी, तानिया भाटिया, पूजा वस्त्राकर, राधा यादव, दयालन हेमलता, अरुंधती रेड्डी.

* सामन्याची वेळ :  रात्री ८.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स