करोना विषाणू संसर्गामुळे जुलैमध्ये होणाऱ्या २०२१ महिला विश्वचषक आणि २०२२ मधील युवा विश्वचषक (१९ वर्षांखालील) या दोन्ही स्पर्धाच्या पात्रता लढती लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

श्रीलंकेत ३ ते १९ जुलैदरम्यान महिलांच्या विश्वचषकासाठीच्या पात्रता लढती होणार होत्या. त्यात यजमान श्रीलंकेसह बांगलादेश, आर्यलड, हॉलंड, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनिया, थायलंड, अमेरिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे १० संघ सहभागी होणार होते. त्यातील तीन संघ न्यूझीलंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. युवा विश्वचषकासाठी पात्रता सामने युरोप गटासाठी डेन्मार्क येथे २४ ते ३० जुलै दरम्यान होते. मात्र लांबणीवर टाकण्यात आलेल्या पात्रता सामन्यांचे आयोजन पुन्हा कधी करायचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.