देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला होता. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही काही दिवसांपूर्वी नजिकच्या काळात भारतात क्रिकेट खेळवलं जाणार नाही हे स्पष्ट केलं होतं. असं असलं तरीही काही आजी-माजी खेळाडू आणि संघमालक प्रेक्षकांविना आयपीएल खेळण्यास तयार आहेत. काही खेळाडूंनी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया चषकाचं आयोजन पुढे ढकलत त्याजागी आयपीएल खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याला कडाडून विरोध केला आहे.

“आमची भूमिका ही आधीपासून स्पष्ट आहे. आशिया चषकाचं आयोजन सप्टेंबर महिन्यात आहे, समजा ही स्पर्धा रद्द करायची असेल तर सध्याच्या परिस्थितीत करोना हेच एक कारण असू शकतं. आयपीएलसाठी आशिया चषकाचं आयोजन पुढे ढकलणं आम्हाला मान्य नाही.” पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वासिम खान यांनी GTV वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली. याआधी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनीही आयपीएलच्या आयोजनासाठी आशिया चषक पुढे ढकलण्यास नकार दिला होता.

मध्यंतरी मी आशिया चषकाचं आयोजन नोव्हेंबर महिन्यात करायचं अशा चर्चा ऐकल्या होत्या, पण ते शक्य नाही. केवळ देशाच्या टी-२० लिगसाठी आशिया चषकासारख्या स्पर्धेच्या आयोजनात बदल करणं योग्य नाही. यासाठी आम्ही कधीच पाठींबा देणार नाही, वासिम खान यांनी पाक क्रिकेट बोर्डाची भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तान क्रिकेट संघ वर्षाअखेरीस घरच्या मैदानावर झिम्बाब्वे आणि त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असल्यामुळे आशिया चषकाच्या आयोजनात कोणताही बदल होणार नसल्याचं खान यांनी स्पष्ट केलं.