खराब कामगिरीने मला बराच काळ सतावले, मात्र आता त्याचा कामगिरीवर परिणाम होऊ देणार नाही, असे बॅडमिंटनपटू सायना नेहवालने सांगितले. तब्बल १५ महिन्यांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवत सायनाने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. ‘‘दुखापती आणि खराब फॉर्म यांनी वर्चस्व गाजवलेला कालावधी आता भूतकाळ झाला आहे. भविष्यात चांगली कामगिरी करण्यासाठी मी सज्ज झाले आहे,’’ असेही तिने पुढे सांगितले.
‘‘सातत्याने अपयश आल्यामुळे मी निराश झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असताना कुठल्याच स्पर्धेत मनासारखी कामगिरी होत नसल्याने निराश होणे स्वाभाविक आहे. मात्र या अपयशासाठी अनेक मुद्दे कारणीभूत होते. पायाच्या बोटाला फ्रॅक्चर होईल अशी कल्पनाही मी केली नव्हती. या दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक होते. त्यामुळे सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेनंतर मी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. याच वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे गोपीचंद सरांशी चर्चा करून कोरिया सुपर सीरिज या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे मलेशिया आणि सय्यद मोदी स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला,’’ असे सायनाने सांगितले.
ती पुढे म्हणाली, ‘‘आगामी काळातही तंदुरुस्ती या मुद्दय़ावरच माझी कामगिरी अवलंबून असेल. चार आठवडय़ांच्या विश्रांती कालावधीत कोर्टवरचा वावर आणि फटक्यांवर मी मेहनत घेतली. या बळावरच मी आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा जिंकू शकले याचा आनंद आहे. याच पद्धतीने सराव केल्यास कामगिरी आणखी सुधारेल,’’ असे सायनाने सांगितले.
‘‘सातत्याने होणारे पराभव मलाही त्रस्त करत होते. मात्र खेळामध्ये सततच्या जिंकण्याबरोबर सततचे पराभवही पचवणे तितकेच महत्त्वाचे असते. आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी मला एका सामन्याची आवश्यकता होती. सय्यद मोदी स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना माझ्यासाठी निर्णायक ठरला. गेले वर्षभर बहुतांशी सामन्यांमध्ये मी १९-२१ अशी पराभूत होत होते. मात्र सय्यद मोदी स्पर्धेच्या डेंग झुआनविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत मी आणखी एक गुण पटकावत आगेकूच केली. दुखापती आणि शरीराची सर्वतोपरी काळजी घेतली आणि असाच सराव केला तर कामगिरी आणखी बहरण्याची संधी आहे,’’ अशी आशा सायनाने या वेळी प्रकट केली.