वेस्ट इंडिजबरोबर मायदेशी होणाऱ्या दोन सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १६ जणांच्या संघामध्ये सहा फलंदाज, पाच गोलंदाज तीन अष्टपैलू आणि एका यष्टीरक्षकाचा समावेश आहे. या कसोटी मालिकेसाठी नवोदित मोहम्मद सिराज याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. मोहम्मद सिराज याने टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मात्र कसोटी संघात त्याला विंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेतून संधी मिळाली आहे. ही संधी मिळण्यामागचे श्रेय त्याने विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना दिले आहे.

एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सिराज म्हणाला की धोनी आणि कोहलीने मला दिलेला मोलाचा सल्ला हे माझ्या कसोटी पदार्पणामागचे खरे कारण आहे. मी जेव्हा टी२० सामन्यात पदार्पण करणार होतो, तेव्हा मी सामन्याआधी विराट कोहलीला भेटलो. मला त्याने सांगितले की आता काहीही दडपण घेऊ नको. सामन्याच्या वेळी बघूया. त्यानंतर जेव्हा सामना सुरु झाला, तेव्हा कोहलीने मला सांगितले की तुझा खेळ मी पाहिला आहे. तू नेहमी जशी गोलंदाजी करतोस तशीच गोलंदाजी कर. त्याचे धीराचे शब्द माझ्यासाठी पुरेसे ठरले.

धोनीबाबत बोलताना सिराज म्हणाला की मी गोलंदाजी करत असताना धोनी स्वतः माझ्याजवळ आला. त्याने मला सांगितले की फलंदाज पद्धतीने पायाची हालचाल (फुटवर्क) करतो, ते नीट पाहा. आणि त्या प्रकारे तुझ्या गोलंदाजीची लाईन आणि टप्पा ठरवून गोलंदाजी कर. या दोघांचा सल्ला मला खूप उपयोगी पडला आणि माझा आत्मविश्वास दुणावला, असेही सिराजच्या सांगितले.