प्रशांत केणी

जागतिक क्रीडा क्षेत्रातील महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या रशियाची उत्तेजकांच्या सेवनामुळे गेल्या काही वर्षांत अपरिमित अधोगती झाली आहे. १० डिसेंबरला जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) चार वर्षांची बंदी घातल्याने रशियाचे क्रीडा क्षेत्र डागाळले. रशियन खेळाडूंच्या कुकर्माची चर्चा ऐरणीवर असतानाच ‘वाडा’च्या ताज्या उत्तेजक सेवन अहवालाने जगातील क्रीडा क्षेत्राला खडबडून जागे केले आहे. उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे दोषी आढळणाऱ्यांच्या संख्येत २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये १३.१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. भारताचे २०१६ मध्ये ६९ खेळाडू दोषी आढळल्याने सहावे स्थान होते, तर २०१७ मध्ये ५७ खेळाडू दोषी सापडल्याने सातवे स्थान झाले आहे. म्हणजेच उत्तेजक प्रतिबंधक नियमावलींच्या उल्लंघनात एकीकडे जागतिक आलेख उंचावत असताना भारताचा आलेख सकारात्मकतेकडे जाणे, हे देशातील क्रीडा क्षेत्रासाठी स्वागतार्ह म्हणता येईल. पण प्रत्यक्ष स्थिती ही इतकी कौतुकास्पद मुळीच नाही.

उत्तेजके म्हणजे कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडापटूने सेवन केलेले अवैध पदार्थ. उत्तेजकांचा इतिहास तसा जुनाच आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या जन्मदात्या ग्रीसमध्ये शतकापूर्वी खेळाडू कामगिरी उंचावण्याच्या इराद्याने उत्तेजक किंवा सामथ्र्य निर्माण करणाऱ्या पदार्थाचे सेवन करीत होते, हे सिद्ध झाले आहे. १९२० च्या दशकात उत्तेजकांवर र्निबध आवश्यक असल्याचा गांभीर्याने विचार सुरू झाला. १९२८ मध्ये आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनेने उत्तेजक सेवनास बंदीचा निर्णय घेतला. १९६६ मध्ये सायकलिंग आणि फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी जागतिक स्पर्धेकरिता उत्तेजक चाचणी लागू केली. पण दुर्दैवाने हेच खेळ उत्तेजकांमध्ये आजही अव्वल आहेत. १९६८ मध्ये ऑलिम्पिकसाठीही उत्तेजक चाचणी घेण्यास प्रारंभ झाला. १९७० पर्यंत जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय संघटनांनी उत्तेजक चाचण्या बंधनकारक केल्या. पण जवळपास ५० वर्षांनीही परिस्थिती सुधारल्याचे आकडेवारीतून निष्पन्न होत नाही, हे उत्तेजकविरोधी चळवळीचे आणि त्यासाठी कार्यरत असलेल्या ‘वाडा’चे अपयश म्हणता येईल का?

उत्तेजकांमध्ये दोषी आढळणाऱ्या राष्ट्रांमध्ये इटली, फ्रान्स, अमेरिका, चीन, रशिया ही आर्थिक आणि क्रीडात्मकदृष्टय़ा संपन्न राष्ट्रेच अग्रेसर आहेत. म्हणजेच जाणीव-जागृतीमध्येच दोष असावा किंवा रशियाप्रमाणेच पदकांच्या शर्यतीत देशाला आणि आपल्या खेळाडूंना पुढे नेण्यासाठी साहाय्य करण्याची वृत्ती जपली जात असावी. २०११ ते २०१५ या कालखंडात रशियाने उत्तेजकांच्या सेवनाला कशा प्रकारे खतपाणी घातले, हे क्रीडा कायदेतज्ज्ञ रिचर्ड मॅकलारेन यांनी काही वर्षांपूर्वी मांडलेल्या अहवालात प्रकाशात आणले होते. जागतिक क्रीडा क्षेत्रातून बंदी घालण्यात आलेल्या रशियाला २०२० चे टोक्यो ऑलिम्पिक आणि २०२२ मधील कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. रशियाचा पाय अधिक खोलात जात असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

पण भारतासाठी ‘वाडा’ची ताजी आकडेवारी नक्कीच समाधानकारक आहे. २०१५च्या अहवालानुसार भारताचे ११७ खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी सापडले होते आणि क्रमवारीत तिसरा क्रमांक होता. या चिंताजनक स्थितीतून झालेली वाटचाल ही नक्कीच आशादायी आहे. त्यामुळे हुरळून जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. ऑगस्टमध्ये देशातील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेवर ‘वाडा’कडून सहा महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता परदेशी संस्थेकडून होणाऱ्या उत्तेजक चाचणीसाठी भारताला दुप्पट-तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. ‘अ’ नमुन्याच्या चाचणीसाठी २१ हजार रुपये आणि ‘ब’ नमुन्याच्या चाचणीसाठी ४३ हजार रुपये हा खर्च भारताला परवडणे कठीणच आहे. त्यामुळे उत्तेजक चाचण्यांची संख्या कमी होण्याची दाट शक्यता आहे. परंतु ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सात महिन्यांवर आली असताना ही हयगय धोकादायक ठरू शकते. वर्षांच्या पूर्वार्धात भारताच्या १० वेटलिफ्टिंगपटूंवर उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे. वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात भारताचे खेळाडू अनेकदा उत्तेजक चाचणीत दोषी सापडले आहेत. परंतु यातून धडा घेतला जात नाही, हीच खंत आहे.

उत्तेजक सेवन प्रकरणी ‘वाडा’चा ताजा अहवाल आशादायी असला तरी हीच वस्तुस्थिती नाही. तूर्तास, उत्तेजकविरोधी चळवळ अधिक सशक्त करण्याची आणि उत्तेजक चाचणी प्रयोगशाळा ‘वाडा’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यरत करण्याची आवश्यकता आहे.

देशांची क्रमवारी

क्र. २०१६ २०१७

१.   इटली    इटली

२.   फ्रान्स    फ्रान्स

३.   अमेरिका  अमेरिका

४.   ऑस्ट्रेलिया ब्राझील

५.   बेल्जियम  रशिया

६.   भारत    चीन

७.   रशिया   भारत

prashant.keni@expressindia.com