News Flash

विश्वचषक युद्धासाठी भारत शस्त्रसज्ज!

विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली.

रवी शास्त्री

प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा इशारा

विश्वचषक क्रिकेट युद्धासाठी भारतीय संघ शस्त्रसज्ज असल्याचा इशारा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला आहे. भारतीय संघ हा लवचीक असून, वातावरणानुसार संघबांधणी करण्यात येईल, असे शास्त्री यांनी सांगितले.

विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली. त्यावेळी तमिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उत्तम पर्याय असल्याचे म्हटले जात होते. परंतु या स्थानावर फलंदाजीसाठी कोणताही खेळाडू निश्चित झाला नसल्याचे शास्त्री यांनी सांगितले. ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ३० मे ते १४ जुलै या कालावधीत इंग्लंडमध्ये होणार आहे.

‘‘प्रसंगानुरूप व्यूहरचना आखण्यासाठी पुरेशी शस्त्रसज्जता आमच्याकडे आहे. आमचा संघ अतिशय लवचीक आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी काही खेळाडूसुद्धा आमच्याकडे आहेत. त्यामुळेच मी त्याची अजिबात चिंता बाळगत नाही,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

‘‘फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आमची रणनीती तयार आहे. यानुसार खेळू शकणारा १५ खेळाडूंचा संघसुद्धा सज्ज आहे. कोणत्याही वेगवान गोलंदाजाला दुखापत झाल्यास बदली खेळाडूसुद्धा उपलब्ध आहे,’’ असे शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिले.

विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धासाठी संघाची पूर्वयोजना आखली जात नाही. चार वर्षांच्या कालावधीत संघाची त्या दृष्टीने तयारी होत असते, असे शास्त्री यांनी सांगितले.

‘‘मोठय़ा स्पर्धासाठीचा प्रवाहच अतिशय उपयुक्त असतो. विश्वचषकांदरम्यानच्या चार वर्षांच्या कालावधीत संघांची तयारी होत असते. विविध परिस्थितीला सामोरे जाण्याची वृत्ती याच काळात विकसित होते,’’ असे शास्त्री म्हणाले.

केदार विश्वचषकात खेळेल!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये अष्टपैलू केदार जाधवला दुखापत झाली, तर मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला बळी मिळवण्यासाठी झगडावे लागले. यासंदर्भात मी कोणतीही चिंता बाळगत नाही, असे शास्त्री यांनी म्हटले आहे.

‘‘या घटनांची मी चिंता बाळगत नाही. २२ मेपासून इंग्लंडमधील सामन्यांत तुम्हाला भारताच्या १५ खेळाडूंचा प्रत्यय येईल. केदारला फ्रॅक्चर झालेले नाही. त्यामुळे ‘थांबा आणि वाट पाहा’ असे धोरण स्वीकारलेले आहे. अजून बराच अवधी असल्यामुळे केदार विश्वचषकात खेळेल,’’ अशी आशा शास्त्री यांनी व्यक्त केली.

ऑस्ट्रेलिया, विंडीज धोकादायक संघ!

विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे धोकादायक संघ ठरतील, असे मत माजी कर्णधार शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.

‘‘मागील वर्षीच्या उत्तरार्धात जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ भारतात आला होतो, तेव्हा आम्ही त्यांना आरामात हरवू, असे मला वाटले होते. परंतु ती मालिका रंगतदार ठरली होती. ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल नसतानाही विंडीजच्या खेळाडूंनी भारताला उत्तम लढत दिली होती,’’ असे शास्त्री यांनी सांगितले. ‘‘गेल्या २५ वर्षांतील जागतिक क्रिकेटचा आढावा घेतल्यास सर्वाधिक विश्वचषक हे ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर जमा आहेत. त्यामुळे यंदाही हा संघ विश्वचषकावर वर्चस्व गाजवू शकतो,’’ असे विश्लेषण शास्त्री यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 1:39 am

Web Title: world arms weapon for the world cup
Next Stories
1 World Cup 2019 : ”चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी ‘टीम इंडिया’कडे हवे तेवढे पर्याय”
2 गोलंदाजांमुळे भारताला विश्वचषक उंचावण्याची संधी -रहाणे
3 भारतीय संघ समतोल; परंतु इंग्लंडला जगज्जेतेपदाची सर्वाधिक संधी!
Just Now!
X