संपूर्ण विश्वात थैमान घातलेल्या करोना विषाणूच्या संसर्गामुळे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याच्या प्रस्तावाला आता जागतिक क्रीडापटूंच्या समूहानेही पाठिंबा दर्शवल्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवरील (आयओसी) दडपण वाढले आहे.

‘‘करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आले असल्याने ‘आयओसी’नेसुद्धा लवकरच ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा,’’ असे निवेदन पत्र जागतिक गटाकडून रविवारी सादर करण्यात आले.

२४ जुलैपासून ऑलिम्पिकला सुरुवात होणार असून ‘आयओसी’चे अध्यक्ष थॉमस बाख यांनी ऑलिम्पिक पुढे ढकलणे अतिघाईचे ठरेल, अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्यामुळे जगभरातील विविध क्रीडा संघटनांनी तसेच खेळाडूंनी ‘आयओसी’वर ताशेरे ओढले असून फ्रान्स, अमेरिका, ब्रिटनमधील जलतरण महासंघांनी यापूर्वीच ऑलिम्पिकमध्ये आपापल्या देशाचे खेळाडू पाठवण्यास नकार दिला आहे. त्याशिवाय स्पेन अ‍ॅथलेटिक्स महासंघ आणि अमेरिकी मैदानी क्रीडा स्पर्धा महासंघानेही ऑलिम्पिक लांबणीसाठी पुढाकार घेतला आहे.

‘‘सध्या सगळीकडे नाजूक स्थिती निर्माण झालेली असतानाही ‘आयओसी’ने अद्याप कठोर निर्णय का घेतलेला नाही, हे अनाकलनीय आहे. ‘आयओसी’च्या पदाधिकाऱ्यांना अजूनही यामागील गांभीर्य कळलेले नाही, हेच यावरून निदर्शनास येते,’’ असे जागतिक क्रीडा गटाचा संस्थापक कॅरड ओ डोनोव्हन म्हणाला. आर्यलडच्या डोनोव्हनने गेल्या काही आठवडय़ांपासून कराटेचा सरावही थांबवला आहे. सध्या ब्रिटनचा माजी सायकलपटू कॅलम स्कीनर या मोहिमेचे नेतृत्व करत आहे.

जागतिक क्रीडापटूंच्या गटात अमेरिका, स्पेन, इटली यांच्याव्यतिरिक्त ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या आणखी काही प्रमुख देशांतील आजी-माजी खेळाडूंचा समावेश आहे. जगभरातील क्रीडापटूंसाठी खेळण्यायोग्य वातावरण निर्माण करण्याबरोबरच खेळाडूंना त्यांचे हक्क मिळवून देण्यास हा गट प्राधान्य देतो.

ऑलिम्पिक ज्योतीसाठी हजारो चाहत्यांची गर्दी

सेनदई (जपान) : एकीकडे करोनामुळे मोठय़ा प्रमाणावर नागरिकांचा बळी जात असताना रविवारी ईशान्य जपानमध्ये ऑलिम्पिक ज्योत पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. दोन दिवसांपूर्वीच जपानमध्ये ऑलिम्पिक ज्योतचे आगमन झाले असून त्यावेळी मात्र चाहत्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. सध्या जपानमधील प्रत्येक शहरात प्रत्येकी एका दिवसासाठी या ज्योतीला फिरवण्यात येणार आहे. ऑलिम्पिकबाबत संभ्रम मात्र अद्यापही कायम आहे.

युव्हेंटसचा फुटबॉलपटू डिबाला करोनाबाधित

रोम : अर्जेटिनाचा आक्रमक पावलो डिबाला हा करोना विषाणू संसर्गाची बाधा झालेला युव्हेंटसचा तिसरा फुटबॉलपटू ठरला आहे. ‘‘मला आताच कोव्हिड-१९च्या चाचण्यांचे अहवाल मिळाले असून, मला आणि माझ्या प्रेयसीला त्याची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे,’’ असे ‘ट्वीट’ २६ वर्षीय डिबालाने केले आहे.

संलग्न देशांकडून करोनाच्या परिणामाचा आढावा

पॅरिस : ऑलिम्पिक स्पर्धेविषयी निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) संलग्न राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनांकडून करोनामुळे खेळाडूंच्या तयारीवर झालेल्या परिणामाचा आढावा मागवला आहे. ‘आयओसी’च्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावर या संदर्भातील निवेदन टाकण्यात आले असून, सर्व राष्ट्रांना लवकरात लवकर याविषयीचा आढावा सोपवणे गरजेचे आहे. ‘आयओसी’च्या प्रश्नावलीत सराव शिबिरे, खेळाडूंची तंदुरुस्ती, क्रीडा साहित्य अशा विविध घटकांची उत्तरे नमूद करणे आवश्यक आहे.

करोनाचा ऑलिम्पिक तयारीवर परिणाम नाही -रीड

नवी दिल्ली : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांमधील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या तयारीला फटका बसला आहे. परंतु भारतीय पुरुष हॉकी संघाच्या सरावावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही, असे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी सांगितले. करोनाचा धोका वाढत असताना भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) आणि हॉकी इंडिया (एचआय) यांनी उचललेली पावले प्रशंसनीय आहेत, असे रीड यांनी सांगितले. ‘साइ’ केंद्रात आम्ही स्वतंत्र आहोत. परंतु आमच्या नियमित वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही, असे रीड या वेळी म्हणाले.

मालदिनी पिता-पुत्राला करोनाची बाधा

रोम : एसी मिलान क्लबचे माजी बचावपटू पावलो मालदिनी यांच्यासह त्यांच्या मुलालाही करोनाची बाधा झाली आहे. एसी मिलानचे तांत्रिक संचालक मालदिनी आणि त्यांचा १८ वर्षीय मुलगा डॅनियल यांना करोना विषाणू संसर्ग झाला आहे. गेले दोन आठवडे घरी स्वयं-अलगीकरणाच्या सूचनांचे पालन करणाऱ्या या दोघांनाही आता विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. ५१ वर्षीय मालदिनीने मिलानकडून ६४७ सामन्यांत प्रतिनिधित्व करताना पाच चॅम्पियन्स लीग विजेतेपदांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.

क्रीडा क्षेत्रासाठी कठीण काळ -मनू भाकर

करोनामुळे सर्वच स्पर्धा किंवा निवड चाचण्या लांबणीवर टाकाव्या लागल्या आहेत किंवा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. मात्र तरीही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने माझी तयारी सुरू आहे, असे नेमबाज मनू भाकरने सांगितले. ‘‘आम्ही आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संस्थेच्या सूचनांचे पालन करीत आहोत. मी घरी असून, सध्याच्या वातावरणाचा माझ्या तयारीवर आणि मानसिकतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. माझे योगा सत्र आणि ध्यानधारणा नित्याने सुरू आहे,’’ असे मनूने सांगितले.