लांब उडीच्या पात्रता फेरीत २२व्या क्रमांकावर घसरण

जागतिकअ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

दोहा : लांबउडीपटू एम. श्रीशंकर याला पात्रता फेरीतच २२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने दोहा येथे सुरू झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताची सुरुवात निराशाजनक झाली.

२० वर्षीय श्रीशंकरला पात्रता फेरीतील तीन प्रयत्नांमध्ये आपल्या वैयक्तिक कामगिरीच्या जवळ पोहोचता आले नाही. त्याने ७.६२ मीटर इतकी उडी घेत २२वे स्थान प्राप्त केले. पात्रता फेरीत सहभागी झालेल्या २७ जणांमध्ये तो शेवटून दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. गेल्या महिन्यात त्याने पतियाळा येथे ८.०० मीटर इतकी कामगिरी नोंदवली होती. श्रीशंकरने ८.२० मीटर इतकी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असून हा राष्ट्रीय विक्रमसुद्धा आहे.

श्रीशंकरने पहिल्या प्रयत्नांत ७.५२ मीटर इतकी उडी मारल्यानंतर दुसऱ्या वेळी त्याने ७.६२ मीटर इतकी झेप घेतली. पण तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नांत त्याने मारलेली उडी अपात्र ठरवण्यात आल्यामुळे पुरुषांच्या लांबउडी प्रकारातील भारताचे आव्हान संपुष्टात आले. अंतिम फेरीसाठी ८.१५ मीटर इतका पात्रता निकष ठरवण्यात आला होता. पण एकाच खेळाडूला हा निकष पार करता आला. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अन्य ११ जणांनी ७.८९ मीटरच्या पुढे कामगिरी नोंदवली.

श्रीशंकरने नोंदवलेली ७.६२ मीटर इतकी कामगिरी ही या मोसमातील त्याची दुसऱ्या क्रमांकाची निचांक कामगिरी ठरली आहे. गेल्या महिन्यात लखनौ येथील राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत त्याने ७.५३ मीटर इतकी झेप घेतली होती. या मोसमात त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत ७.९० मीटर आणि ८.०० मीटर अशी कामगिरी नोंदवली होती.