स्वित्झर्लंडच्या ग्लास्गो शहरात सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१९, २०-२२, २२-२० असा पराभव केला.

नोझुमी ओकुहारा आणि सिंधू यांच्यातला सामना हा अटीतटीचा होणार हा अंदाज सर्वांनाच होता. अपेक्षेप्रमाणे सामन्यालाही तशीच सुरुवात झाली, पहिल्या काही मिनीटांमध्ये सिंधू आणि ओकुहारा या ५-५ अशा बरोबरीत खेळत होत्या. मात्र यानंतर सिंधूने आपल्या खेळात बदल करत आक्रमक स्मॅश फटक्यांचा वापर केला. सिंधूच्या या आक्रमक खेळापुढे नोझुमी ओकुहारा काहीशी बॅकफूटला गेलेली पहायला मिळाली. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूकडे ११-५ अशी आघाडी होती. त्यामुळे सिंधू पहिला सेट सहज जिंकेल असा सर्व चाहत्यांना विश्वास होता. मात्र यानंतर नोझुमी ओकुहाराने सामन्यात पुनरागमन करायला सुरुवात केली. महत्वाच्या क्षणी सिंधूची सर्विस ब्रेक करत ओकुहाराने सिंधूला मागे टाकलं. यात सिंधूकडून झालेल्या काही क्षुल्लक चुकांचीही भर पडली. ६ गुणांनी आघाडीवर असलेली सिंधू सामन्यात अचानक पिछाडीवर पडली, यानंतर सिंधूने सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला, मात्र ओकुहाराने वेळेतच पहिला सेट २१-१९ असा खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र पी.व्ही.सिंधूने दणक्यात पुनरागमन केलं. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये सिंधूने आपल्याकडे नाममात्र गुणांची आघाडी ठेवली होती. मात्र त्यानंतर सिंधूने ओकुहाराला बॅकफूटवर ढकलण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सेटच्या मध्यांतराला सिंधूने सेटवर आपली पकड मजबूत ठेवली होती. मात्र मध्यांतरानंतर ओकुहाराने पुन्हा एकदा सिंधूला कडवी टक्कर देत सामन्यात पुनरागमन केलं. दुसरा सेट मध्ये दोघींचा अटीतटीचा सामना रंगलेला पहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत २०-२० ही स्कोअरबोर्डवरची कोंडी फुटत नव्हती. यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये काही चांगल्या रॅली उपस्थित प्रेक्षकांना पहायला मिळाल्या. मात्र त्यानंतर सिंधूने आपला अनुभव पणाला लावत दुसरा सेट २२-२० असा खिशात घातला.

तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपल्या क्षमतेप्रमाणे खेळ करत सामना रंगतदार अवस्थेत आणून ठेवला. दोन्ही खेळाडू एकमेकांनी तिसऱ्या सेटमध्ये मोठी आघाडी घेऊ देत नव्हत्या. मात्र तिसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूने आपल्या चातुर्याचा वापर करत ओकुहाराचं लक्ष विचलीत करुन ११-९ अशी आघाडी घेतली. मात्र मध्यांतरानंतर ओकुहाराने तितक्याच जोरात पुनरागमन करत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर सिंधू आणि ओकुहारा यांच्यातला सामना हा इतका अटीतटीता होत होता की नेमकं या सामन्यात कोण बाजी मारेल हे समजत नव्हतं. मात्र जपानच्या नोझुमीने आपला संपूर्ण जोर लावत सामन्यात शेवटच्या क्षणात आघाडी घेत तिसरा सेट आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आपल्या नावे केली. अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळवण्याचं सिंधूचं स्वप्न पुन्हा एकदा अपुर्णचं राहीलं आहे. याआधी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून अशाच पद्धतीने पराभव स्विकाराला लागला होता.