ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालला पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीतील या पराभवासाठी सायना नेहवालने स्पर्धेच्या वेळापत्रकाला जबाबदार धरले आहे. दोन सामन्यांमध्ये विश्रांतीसाठी २४ तासांपेक्षाही कमी वेळ देण्यात आल्यामुळेच उपांत्य फेरीत पराभव स्वीकाराला लागला, असे सायनाने म्हटले. उपांत्य फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराने सायनाचा १२-२१, २१-१७, २१-१० असा पराभव केला.

‘माझा सामना दुसऱ्या सत्रात असेल, असे वाटले होते. मात्र तसे नव्हते आणि हे समजल्यावर मला आश्चर्य वाटले,’ असे सायना नेहवालने म्हटले. ‘दोन सामन्यांमध्ये २४ तासांचेही अंतर नव्हते. त्यामुळे मला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. वेळेचा अभाव असल्याने कोणतीही तयारी करता आली नाही,’ असे लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या सायनाने म्हटले. सामन्याची वेळ आणि स्पर्धेचे वेळापत्रक याबद्दल सायनाने नाराजी व्यक्त केली.

सायनाने उपांत्यपूर्व फेरीच्या मॅरेथॉन सामन्यात किर्स्टी गिलमोरचा पराभव केला. स्कॉटलंडच्या गिलमोरला सायनाने १ तास १४ मिनिटांच्या लढतीनंतर पराभूत केले. या विजयामुळे सायनाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सायनासमोर जपानच्या ओकुहाराचे आव्हान होते. ओकुहाराने दोन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या कॅरोलिना मरिनचा २१-१८, १४-२१, २१-१५ असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. विशेष म्हणजे सायनाप्रमाणेच ओकुहारालादेखील दोन सामन्यांदरम्यान २४ तासांपेक्षा कमी वेळ विश्रांती मिळाली होती.