पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल स्थिर

भारताचे युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि रिया मुखर्जी यांनी मंगळवारी जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल १०० जणांमध्ये स्थान मिळवले. लक्ष्य सेनच्या क्रमवारीत २८ स्थानांनी सुधारणा झाली असून तो ७६व्या स्थानी पोहोचला आहे. रियाने ९४वा क्रमांक प्राप्त केला आहे.

ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँगला पराभूत करणाऱ्या बी. साईप्रणीतनेही १९व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. किदम्बी श्रीकांतच्या क्रमवारीत कोणताही बदल झाला नसून तो सातव्या स्थानी आहे. त्यापाठोपाठ समीर वर्मा (१४), एच. एस. प्रणॉय (२४), शुभंकर डे (४३), पारुपल्ली कश्यप (४८), अजय जयराम (५२) आणि सौरव वर्मा (५३) यांनी स्थान पटकावले आहे.

महिलांमध्ये पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी क्रमवारीत आपले स्थान कायम राखले असून त्या अनुक्रमे सहाव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. पुरुष दुहेरीत, सात्त्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी २४वे स्थान पटकावले असून मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी २७व्या क्रमांकावर आहेत.