ग्लास्गोमध्ये सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवालला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. रियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या जपानच्या नोझोमी ओकुहाराने सायनाचा १२-२१, २१-१७, २१-१० असा पराभव केला. यामुळे सायनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. २०१५ मध्ये याच स्पर्धेत सायनाने रौप्य पदक पदकावले होते. मात्र यंदा उपांत्य फेरीतच सायनाचे आव्हान संपुष्टात आले.

उपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला पराभवाचा धक्का देणाऱ्या ओकुहाराने दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये जबरदस्त खेळ केला. पहिला गेम अगदी आरामात खिशात घालणाऱ्या सायनाचा त्यानंतर निभाव लागला नाही. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला २४ तास उलटून जाण्याआधीच सायनाला उपांत्य फेरीचा सामना खेळावा लागला. त्याचा परिणाम तिच्या खेळावर जाणवला. थकव्यामुळे सायनाला प्रतिस्पर्ध्याच्या तोडीस तोड खेळ करण्यात अपयश आले. त्यामुळे पहिला गेम गमावूनही ओकुहाराने सामन्यात पुनरागमन केले आणि ७४ मिनिटांमध्ये सामना खिशात घातला.

पहिला गेममध्ये सफाईदार खेळ करणारी सायना दुसऱ्या गेममध्ये पिछाडीवर होती. १० सुपर सीरिज विजेत्या सायनाला ४ सुपर सीरिज विजेत्या ओकुहाराने कडवी झुंज दिली. सुरुवातीला ४-१ अशा पिछाडीवर पडलेल्या सायनाने त्यानंतर १०-१० आणि १५-१५ अशी बरोबरी साधली. मात्र त्यानंतर रिओ ऑलिम्पिक कांस्य पदक पटकावणाऱ्या ओकुहाराने गियर बदलला. ओकुहाराने दुसरा गेम २७ मिनिटांमध्ये जिंकत सामना बरोबरीत आणला.

तिसऱ्या गेममध्ये सायनाची प्रचंड दमछाक झाली. जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असलेली ओकुहारा या गेममध्ये खूपच वरचढ ठरली. थकव्यामुळे सायनाला फारसा प्रतिकार करता आला नाही. हा गेम ओकुहाराने २१-१० असा सहज खिशात घातला. त्यामुळे सायनाचे आव्हान संपुष्टात आले. आता दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याकडे भारतीयांचे लक्ष असेल. या सामन्यात पी. व्ही. सिंधूचा मुकाबला चीनच्या चेन युफेईशी होणार आहे.