मिया ब्लिचफील्ड विरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सुमार पंचगिरीवर सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी टीका केली आहे. ‘‘दुसऱ्या गेममध्ये दोन मॅचपॉइंट मिळाले असतानाही पंचांनी मला गुण नाकारले, यावर माझा विश्वासच बसत नाही. त्याउलट पंच म्हणून कामगिरी बजावणे किती अवघड आहे, हे मला ते उद्धटपणे सांगतात. मला गुण का नाकारण्यात आला, हेच मला कळले नाही,’’ असे सायनाने सांगितले. थेट प्रक्षेपण होत नसल्यामुळे या सामन्यात ‘व्हिडीओ रेफरल’ प्रणाली उपलब्ध नव्हती. जागतिक स्पर्धेत सर्व कोर्टवर ही सुविधा नसल्याबद्दल सायनाने नाराजी व्यक्त केली.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुसऱ्या गेममध्ये दोन वेळा मॅचपॉइंट मिळवूनही आठव्या मानांकित सायनाला डेन्मार्कच्या मिया ब्लिचफील्ड हिच्याकडून तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. १ तास १२ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सायनाला २१-१५, २५-२७, १२-२१ अशी हार पत्करावी लागली.

कॉमवेल्थ गेम्सचे (2014) चॅम्पिअन आणि सायनाचा पती पारूपल्ली कश्यप यानेदेखील खराब अंपायरींगवर टीका केली आहे. “खराब अंपायरींगमुळे दोन पॉईंट्सचे नुकसान झाले आणि सामन्यादरम्यान अनेक चुकीचे निर्णय दिले गेले. जागतिक स्पर्धेत रिव्ह्यूची सुविधा उपलब्ध नव्हती यावर विश्वास बसत नाही,” असे तो यावेळी म्हणाला. तसेच खेळात कधी होणार असा सवालही त्याने केला आहे.