World Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा २१-१६, २४-२२ असा पराभव केला. सामन्यातील पहिला गेम संघर्षपूर्ण झाला, पण तो सिंधूने २१-१६ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये यामागुची हिने १९-१२ अशी आघाडी घेतली होती. पण त्यांनतर सिंधूने धमाकेदार कमबॅक करत २०-२० अशी बरोबरी साधली. त्यांनतर सामना अत्यंत रंगतदार झाला. अखेर सिंधूने २४-२२ असा गेम जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅरोलिना मरीन हिच्याशी होणार आहे.

काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने जपानच्या नोझुमी ओकुहारा हिचा २१-१७, २१-१९ असा पराभव केला होता. या विजयाबरोबरच ओकुहाराने मागील स्पर्धेत तिच्या केलेल्या पराभवाचा वचपा काढला. थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१५, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा सिंधूने काढला होता.