स्पेन येथे पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात जागतिक बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. मात्र त्याच वेळेस टोक्यो ऑलिम्पिक आयोजित करण्यात आल्याने ही स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

‘‘जागतिक बॅडमिंटन स्पर्धा नेहमी ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येते. २०२१मध्ये ती स्पेनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मात्र त्याचदरम्यान ऑलिम्पिक होणार असल्याने यजमान स्पेनशी बोलणी सुरू आहेत,’’ असे जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून (बीडब्ल्यूएफ)सांगण्यात आले आहे. सध्याच्या करोनाच्या स्थितीत ‘बीडब्ल्यूएफ’कडून १२ एप्रिलपर्यंत बॅडमिंटनच्या सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

कुमारी विश्वचषक स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच!

नवी दिल्ली : भारतात नोव्हेंबरमध्ये कु मारी (१७ वर्षांखालील)  विश्वचषक फु टबॉल स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पार पडेल, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून (एआयएफएफ) व्यक्त करण्यात आला आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) कु मारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार खेळवायची की नाही यासंदर्भातील अंतिम निर्णय घेईल. अजून सात महिने बाकी असल्याने सध्या त्यावेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येणार नाही. विश्वचषकापूर्वीच्या युरोपातील आणि आफ्रिकेतील पात्रता स्पर्धा बाकी आहेत,’’ असे ‘एआयएफएफ’चे सरचिटणीस कुशल दास यांनी सांगितले. ही विश्वचषक स्पर्धा २ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत भारतात होणार आहे.

चॅँपियन्स लीगचे भवितव्य आज ठरणार

नियॉन (स्वित्र्झलड) : चॅँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या या हंगामातील उर्वरित लढतींबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी युरोपियन युनियन फुटबॉल संघटनेच्या (यूएफा) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणाऱ्या बैठकीत होणार आहे. ‘यूएफा’कडून निवेदनाद्वारे हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. या बैठकीत खेळाडूंची होणारी अदलाबदल आणि त्यांचे करार याविषयीही चर्चा करण्यात येणार आहे.