भारताच्या पी. व्ही. सिंधूला ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेच्या  सुवर्णपदकाने दोनदा हुलकावणी दिली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या स्पध्रेत आणखी एका दिमाखदार कामगिरीसह सोनेरी यश मिळविण्याचा निर्धार सिंधूने केला आहे.

गेल्या काही वर्षांत सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. दोन सलग रौप्यपदके आणि दोन कांस्यपदके तिच्या खात्यावर जमा आहेत. परंतु अद्याप सुवर्णपदक तिला जिंकता आलेले नाही. २०१७ मध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून ११० मिनिटांच्या रोमहर्षक लढतीत सिंधूचा पराभव झाला, तर २०१८ मध्ये ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मरिनने तिची सुवर्णपदकाची वाटचाल रोखली. गेल्या महिन्यात इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या २४ वर्षीय सिंधूला जागतिक स्पध्रेसाठी पाचवे मानांकन देण्यात आले आहे.

सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत ताय झूचे आव्हान

  • सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून, दुसऱ्या फेरीत पाय यू पो (चायनीज तैपेई) किंवा लिंडा झेटचिरी (बल्गेरिया) यांच्यातील विजयी खेळाडूशी तिची गाठ पडेल.
  • सिंधूने विजयी प्रारंभ केल्यास तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बिवेन झँगशी गाठ पडेल आणि मग उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या ताय झू यिंगशी आव्हानात्मक लढत होऊ शकेल.
  • सिंधूने उपांत्य फेरी गाठल्यास सायना नेहवालशी तिचा सामना होऊ शकेल. अर्थात यासाठी सायनानेही सुरुवातीचे टप्पे पार करायला हवेत.

सायनासाठी पदकाची वाट खडतर

आठव्या मानांकित सायनाच्या खात्यावर जागतिक स्पध्रेचे एक रौप्य आणि एक कांस्यपदक जमा आहे. सायनालाही पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून, दुसऱ्या फेरीत सॅब्रिना जॅक्वेट (स्वित्र्झलड) आणि सोराया डी विश ईजबेर्गेन (नेदरलँड्स) यांच्यातील विजयी खेळाडूशी तिची गाठ पडेल.

  • पुरुष एकेरीत मार्चमध्ये इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पध्रेची अंतिम फेरी गाठणाऱ्या किदम्बी श्रीकांतने गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन केले होते.
  • खांद्याच्या दुखापतीशी सामना करणारा समीर वर्माची पहिली लढत सिंगापूरच्या लोह कीन येवशी होणार आहे.
  • स्विस खुल्या स्पध्रेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या बी. साईप्रणीतला पहिले आव्हाने कॅनडाच्या जेसन अ‍ॅन्थनी हो-शुईचे असणार आहे.
  • एच. एस. प्रणॉयला सलामीच्या सामन्यात फिनलँडच्या ईटू हेयनोशी सामना करावा लागणार आहे.
  • पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने दुखापतीमुळे स्पध्रेतून माघार घेतली आहे. परंतु मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी, एमआर अर्जुन आणि रामचंद्रन श्लोक तसेच अरुण जॉर्ज आणि सन्यम शुक्ल अशा तीन जोडय़ांवर भारताच्या आशा आहेत.
  • महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी, जक्कमपुडी मेघना आणि पूर्विशा एस. राम, पूजा दांडू आणि संजना संतोष या तीन जोडय़ा सहभागी होणार आहेत.
  • मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की जोडीची सलामीची लढत इंग्लंडच्या बेन लेन आणि जेसिका पुघ जोडीशी होणार आहे.