भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग इंडियाला भारतामधील अधिकृत राष्ट्रीय संघटना म्हणून मान्यता द्यावी, अशी विनंती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) अध्यक्ष डॉ. चिंग कुओ वुई यांनी विनंती केली आहे.
बॉक्सिंग इंडियास मान्यता देण्यास नकार हे ऑलिम्पिक चळवळीच्या नियमांविरुद्ध आहे, असे सांगून वुई पुढे म्हणाले की, ‘‘आंतरराष्ट्रीय महासंघाने या संघटनेस मान्यता दिल्यानंतर राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्यामध्ये ढवळाढवळ करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय क्रीडा संघटनांना मान्यता देण्याचा अधिकार हा जागतिक संघटनांकडे असतो.’’  
बॉक्सिंग इंडियाची निवडणूक चुकीच्या पद्धतीने झाली असल्याच्या दोन-तीन तक्रारी आपल्याकडे आल्याचे आयओएने म्हटले आहे.
‘‘आयओएची ही भूमिका ऑलिम्पिक चळवळीच्या विरोधात आहे. ऑलिम्पिक चळवळीविरुद्ध कोणाच्याही मनात मतभेद असता कामा नये. सर्वानीच ऑलिम्पिक चळवळीचे पालन करायला हवे. माँटे कालरे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत आम्ही आयओएचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्याशी चर्चा केली होती. त्या वेळी या मुद्दय़ाविषयी आपल्याला पूर्ण माहिती असल्याचे रामचंद्रन यांनी सांगितले होते,’’ असे डॉ. वुई म्हणाले.